Showing posts with label अनोळखी.. एक भयकथा. Show all posts
Showing posts with label अनोळखी.. एक भयकथा. Show all posts

Friday, July 28, 2017

अनोळखी- एक भयकथा ( 8th Part)

आईच्या आठवणीतंच सकाळ उजाडली.. सर्व आटोपून मी निघण्याची तय्यारी करू लागले.. जास्त लवाजमा सोबत नव्हता घेतला.. दोन जोडी कपडे आणि काही आवश्यक वस्तूच घेतल्या होत्या बॅगेत.. सकाळी अकराच्या आसपास एसटी कुर्ला आगारातून सुटली, ती पंधारवाडीला जाण्यासाठी.. प्रवास साधारण सहा ते सात तासांचा होता.. पण, अर्ध्या वाटेत एसटी बंद पडल्यामुळे पंधारवाडीला पोहचायला खुपंच ऊशीर झाला.. संध्याकाळी सहाला पोहोचणारी एसटी तेव्हा रात्री साडेअकराला पोहोचली होती.. एसटीमध्ये प्रवासीदेखील जेमतेमंच उरले होते.. पंधारवाडी स्टँड आलं आणि मी एसटीमधून उतरले.. त्याकाळी गावात वीज नव्हती.. पण, तरीही त्या स्टँडवर एक विजेचा टिमटिमता दिवा होता.. बाकी एसटी स्टँड वाटावं असं तिथं काहीच नव्हतं.. साधं बसायला एक बाकडाही नव्हता.. मी हातातली बॅग जमिनीवर ठेवणारंच होते की, तेवढ्यात एसटीने माझ्यापासून चाळीस-पंन्नास मीटर अंतरावर जावून करकचून ब्रेक मारला.. एसटी जागच्या जागी थांबली.. धाडकन एसटीच्या पत्र्याचा दरवाजा उघडला आणि आतून चार प्रवासी खांद्यावर अडकवलेल्या भरभक्कम बॅगांसकट खाली उतरले.. त्यांना सोडून ती एसटी निघून गेली.. ही माणसं मुंबईपासूनंच माझे सहप्रवासी होते ह्या एसटीमध्ये.. एसटी जेव्हा वाटेत बंद पडली होती तेव्हा हे चारंही जण इतर प्रवाश्यांशी टवाळकी करत होते.. त्यांच्या वागण्यावरून ते सराईत गुन्हेगारंच वाटत होते.. त्यामुळे हे इथे असे अचानक उतरल्यामुळे सहाजिकंच माझ्या छातीत भितीने धडधडायला लागलं होतं.. माझ्याकडे नजर रोखून ते चौघेही गंभीर चालीने येवू लागले.. त्यांच्या मनात काहीतरी वाईट खदखदतंय ह्याचा अंदाजा मला त्यांच्या हावभावाने एव्हाना आला होता.. ते माझ्या दिशेने सरसावू लागले.. त्या प्रत्येकांच्याच चेह-यावर त्यावेळी एक कावेबाज हास्य खुललं होतं.. पुढचं ओळखून मी स्वतःला सावरत क्षणाचाही विलंब नं लावता तिथून पळ काढला.. ते चौघेही माझा पाठलाग करू लागले.. मी जास्त लांब नाही जावू शकले आणि थोड्याच अंतरावर त्यांनी मला गाठलं.. मी भितीने थरथर कापत होते अन ते नराधम एखाद्या क्रूर राक्षसाप्रमाणे हसत होते.. त्यातल्या एकाने त्याची खांद्यावरची बॅग काढून खाली काढून ठेवली अन पुढे होत माझे कपडे फाडायला लागला.. तश्या बाकीच्यांनीही बॅगा धडाधड जमिनीवर फेकून दिल्या आणि मला ओरबाडायला सुरूवात केली.. तसा त्यांचा हात जोरात झटकून मी कशीबशी तिथून निसटली..!!

ह्या अनपेक्षित घडलेल्या प्रसंगाने मी पूर्णपणे हादरून गेली होती.. भिती तर नसानसांत ऐवढी भिनली गेली होती की, थोड्याच वेळात भोवळ येवून मी तिथेच धाडकन कोसळले.. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा जाणवलं की, माझ्या अंगावर जवळ-जवळ जेमतेमंच कपडे शिल्लक होते.. त्या नराधमांनी त्यांचा डाव साधला होता.. माझ्या अंगात जराही त्राण उरला नव्हता.. डोळेसुद्धा जड झाले होते.. तेव्हा त्या चौघांचाही कुजबूजण्याचा आवाज माझ्या कानात घुमायला लागला.. ते मला मारून टाकायचा बेत आखत होते.. त्यांना हे प्रकरण पोलिसांपर्यंत जावू द्यायचं नव्हतं.. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी होती नव्हती तेवढी सगळी ताकद एकटवून उठून धावत सुटले.. ह्या नराधमांच्या तावडीत जर परत सापडले तर काय होईल ह्या नुसत्या विचारानेच माझ्या मनाचा थरकाप उडाला आणि मग माझ्या पळण्याचा वेगही आपोआपंच वाढला.. शेवटी धावून-धावून मी दमले.. मागे वळून पाहिलं तर ते चौघेही कुठेच दिसत नव्हते.. त्यामुळे थोडी उसंत खावी म्हणून मी थांबले.. लागलेल्या धापांना आवर घालत सहजंच बाजूला नजर टाकली तेव्हा लक्ष्यात आलं की, मी फिरून पुन्हा त्याच एसटी स्टँडवर आले होते..!! तो स्टँड बघून आता डोकं पार चक्रावून गेलं अन मग मी तिथेच हंबरडा फोडून रडू लागले.. त्यावेळेस माझं भानही हरवलं.. अश्यावेळी काय करावं काहीच सुचत नव्हतं.. शरीरानेही साथ द्यायचं टाळलं होतं.. तेव्हा अचानकंच ते चौघेही माझ्या पुढ्यात येवून उभे राहिले, मी तर आता हार मानली होती.. प्रतिकार करण्यासाठी अंगात जराही ताकद उरली नव्हती.. तेव्हा हात जोडत, जीवाची भिक मागत घायाल झालेला माझा जीर्ण देहं तिथेच जमिनीवर पडला.. मग तडक त्यातल्या एकाने माझी केसं पकडून तसंच फरफटंत स्टँडच्या कडेला नेलं.. फरफटल्यामुळे जमिनीवर विखुरलेल्या छोट छोट्या दगडी खड्यांनी माझं शरीर रक्तंबंबाळ झालं होतं.. त्याच अवस्थेत केसं मुठीत गच्चं धरूनंच त्याने मला उठवलं.. मी पडत धडपडत कशीबशी उठले.. पण, तेवढ्यात माझ्या पुढ्यात उभा असलेल्या दुस-या नराधमाने कसलाही विचार नं करता पोटात धारधार सुरा भोसकला.. त्या सु-याच्या घावाने माझं शरीर कळवलं अन एक जोरदार किंकाळी फोडून जमिनीवर तडफडत पडलं.. आता डोळ्यांपुढे ते चौघेही गरागरा फिरायला लागले होते.. माझी शुद्ध हरपली.. पण, तरीही आसपासचा आवाज घंटानादाप्रमाणे कानात घुमायला लागला होता.. माझ्या डोळ्यांची झापड अर्धवट उघडी होती.. त्यामुळे जे काय चालू होतं ते अस्पष्ट का होईना पण दिसत होतं.. अचानकंच बोलता- बोलता सावित्री शांत झाली.. अन क्षणार्धातंच घरात स्मशान शांतता पसरली.. सर्वजण एकमेकांकडे बघायला लागले.. कोणाला काहीच समजत नव्हतं.. तेव्हा मग हळूच तिच्या ईवळण्याचा आवाज घराची शांतता चिरत सर्वांच्या कानावर येवून दणकन आपटला.. तिने तिचं जळालेलं ओठ विस्कटून विद्रुप चेह-यावर उमटवलेलं भयाण हास्य अंगाचा थरकाप उडवत होता.. समीरकडे नजर रोखतंच सावित्री दुडक्या चालीने त्याच्याजवळ आली.. तिच्या डोळ्यांत आता रक्ताचे थेंब अश्रूंच्या स्वरूपात जमू लागले होते.. तिच्या तोंडातून निघणारी गरम वाफ त्याच्या तोंडावर जावून आदळत होती.. जळालेल्या चमडीचा वासही अजून उग्र होऊन घरभर पसरत होता.. डोळ्यांची बुब्बुळं भराभर फिरवत तिने आवंढा गिळून चिडलेल्या अन कर्कश आवाजात बोलू लागली- जिवंतपणीच मला नरकयातना देण्यासाठी त्यातल्या एका नराधमाने जास्त वेळ नं दडवता खिशातून लाईटर काढलं अन माझ्या कपड्याच्या टोकाशी धरलं.. त्या फाटलेल्या तुकड्यासोबतंच माझ्या जीर्ण आणि रक्ताळलेल्या शरीरानेही पेट घेतला.. मी खुपच हतबल झाले होते.. माझ्या शरीरात ओरडण्याइतपतंही अवसान शिल्लक राहिलं नव्हतं.. मुक्यापणे जळत रहाण्याखेरीज मला काहीच करता येत नव्हतं.. मी अगतिक झाले होते..

थोड्या वेळातंच आगीचे चटके गार पडू लागले.. मरणाची वाट बघत असलेल्या माझ्या सोशीक शरीरात अजूनंही जीव बाकी होता.. अर्धवट जळालेल्या माझ्या शरीरामधून मांस जळाल्याचा उग्र वास आणि निघणारा धूर स्टँडभोवती पसरत होता.. पण, त्या निर्दयी लोकांना माझी जराही कीव येत नव्हती.. तश्या अवस्थेतंच त्यांनी मला जवळंच खोदून ठेवलेल्या खड्डयात पुरून टाकलं.. बघता बघता काही क्षणातंच राहिलेल्या सर्व स्वप्नांचा झालेला चुराडा, मागे ठेवून मी माझा प्राण सोडला.. त्यांच्या हसण्याचा क्रूर आवाज हा मी ऐकलेला शेवटचा आवाज ठरला..!!

स्टँडजवळंच टाकलेल्या बॅगा पटापट उचलत ते आता काय करायचं ह्याचा विचार करू लागले.. आता रात्र खुप झाली होती.. त्यामुळे सकाळशिवाय कोणतंही वहान त्यांना मिळणं शक्य नव्हतं... त्याकाळी प्रवासाचं प्रमुख साधन बैलगाडी आणि एसटीच होती.. बैलगाडी ह्यावेळेस भेटणं शक्य नव्हतं अन एसटीची फेरीदेखील दिवसभरातून दोनदाच होती.. पहिली फेरी दुपारी तीनची आणि दुसरी फेरी संध्याकाळी सहाची.. आता पहाटेचे चार वाजत आले होते. थोड्याच वेळात सुर्योदय होणार होता... त्यामुळे स्टँडवर ताटकळत बसण्यापेक्षा त्यांना गावात जाणंच जास्त सोयीचं वाटलं.. जसं जमेल तसं चालत ते गावाच्या वेशीजवळ आले.. वेशीपासून गाव साधारण तीन-चार किलोमीटर लांब होतं.. ईथपर्यंत पोहोचायलाच त्यांना दोन तास लागला होता.. तोवर सुर्यदेखील उगवला होता.. त्यामुळे आजूबाजूचा परिसर आता प्रकाशामध्ये व्यवस्थीतपणे दिसायला लागला.. गावक-यांची आपापल्या शेतावर जाण्यासाठी लगबगही चालू झाली होती.. सारं वातावरण प्रसन्न वाटत होतं.. तेव्हा तिथूनंच बैलगाडी हाकत जाणा-या ग्यानबा नामक गावक-याला ते चौघेही मदतीसाठी अडवतात.. काही तासांपुरती गावामध्ये राहण्याची सोय करायला सांगून त्याबदल्यात त्याला जास्तीचे पैसेही देवू करतात.. पैश्यांच्या हव्यासापोटी त्याने त्या चौघांनाही त्याच्याच एका वापरात नसलेल्या खोपट्यामध्ये नेलं.. तिथेच त्यांना जेवणाचीही सोय करून दिली.. दारू तर त्या चौघांनीही सोबतंच आणली होती.. त्यामुळे त्यांच्या मनासारखं छान जमून आलं होतं.. सर्व आटोपून ते खोपट्याच्या बाहेरंच अंथरून ठेवलेल्या फाटक्या गोणपाटांवर येवून बसले.. आसपास एक फिरती नजर टाकून ते सर्व दारूच्या मैफीलीला सुरूवात करतात.. हे गाव त्यांच्या डोळ्यांना भावलं होतं.. गावाची हिरवळ डोळ्यांत साठवत ते दारूचे घोट रिचवत होते.. ग्यानबाने सर्व व्यवस्था चांगली करून दिली होती.. दारूचा प्याला घश्याखाली उतरवंत ते मैफीलीचा आनंद घेत होते.. आता सुर्यसुद्धा डोक्यावर आला होता.. दारूची धुंदीही त्या चौघांवर चांगलीच चढली होती.. त्यात रात्रभर झोपंही मिळाली नव्हती.. म्हणून नशेतंच ग्यानबाला हाक देवून ते सर्व आवरायला सांगतात.. पण, हाकेला ओ देण्यासाठी तो तिथे नव्हताच.. तो तर केव्हाचाच शेतातल्या कामासाठी निघून गेला होता.. दारूच्या धुंदीत त्यांना ते आठवत नव्हतं.. त्यामुळे एकसारखं ग्यानबाच्या नावाचा जाप त्यांनी सुरू ठेवला होता.. ऐवढा वेळ आवाज देवूनंही तो येत नाही हे पाहून त्यातला एक ग्यानबाच्या नावाने शिव्या हासडणारंच होता की, तेवढ्यात तिथे एक विशीतली तरूणी पायातल्या पैंजणांचा आवाज करत तिथे आली.. तिचं रूप त्या ऊन्हात लखलखंत होतं.. नववारीमध्ये झाकलेलं तिचं अंगं डोक्यावरच्या पदराने आणखीनंच शोभून दिसत होतं.. अश्या ह्या अप्सरेला पाहून त्या चौघांचीही वाईट नजर तिच्या सर्वांगावर रेंगाळते.. हापापलेल्या नजरेने ते तिला न्याहाळू लागतात.. ती मात्र तशीच लाजत, डोक्यावरचा पदर सावरत तिथेच उभी असते.. तेव्हा त्या चौघांपैकी एक स्वतःला सावरत तिला काही बोलाणारंच होता की, ते आधीच ओळखून तिच बोलते- " म्या इंदू.. ग्यानबा धायगुड्यांची ल्योक.. बा ने मला तुम्हासणी काय हव नगं ते संमदं बगायला धाडलंया.." तिच्या ह्या असल्या मादक आवाजाने त्यांना जागच्या जागीच पार घायाळ करून टाकलं होतं.. कोणालाच कशाची शुध्दं नव्हती.. मग ती तशीच पैंजणांचा आवाज करत मटकत त्यांच्या पुढ्यात येवून, रिकाम्या झालेल्या दारूच्या बाटल्या आणि खरकटी भांडी आवरून तिथून आली तशीच निघूनंही जाते.. त्या चौघांच्या डोळ्यांत आता मात्रं तिचीच नशा चढलेली असते.. तिच्या त्या मादक आठवणीतंच ते धुंद होवून तिथेच गोणपाटावर अंगं टाकून झोपी जातात.. रात्री जागरण झाल्यामुळे पडल्या जागी त्यांना गाढ झोप लागते..!!

सायंकाळचे साडेचार वाजत आले होते.. तेव्हा कसल्याश्या तरी आवाजाने त्यातल्या एकाला जाग आली.. डोळे चोळतंच तो आजूबाजूला नजर फिरवतो.. त्यासरशी छमम छमम पैंजणांचा आवाज करत इंदू त्याच्या पुढ्यात येवून उभी रहाते, तशी ह्याच्या ओठांची पाकळी खुलते.. " पावणं, आता दिस मावळाया लागलाय.. तवा तुम्हासणी स्टँडपतुरचा परवास तासाभरात पुरा करायचा आसल तर, आसं गावाला हेलपाटा मारून नका जावु.. म्या सांगतेया त्या वाटेनी जावा, लगीच तासाभरात स्टँडवर पोहचाल.." तिच्या ह्या मादक आवाजातलं बोलणं ऐकून तो हुळरून जातो.. तसाच जाग्यावर उभा राहून तो नुसतं तिला न्याह्याळाला लागतो.. त्याचं न्याह्याळणं चालूच असतं पण ती पटकन जावून अगोदरंच सोय करून ठेवलेली बैलगाडी खोपट्याजवळ घेवून येते.. बैलांच्या घुंगरांच्या आवाजाने इतर तिघांनाही जाग येते.. तेव्हा त्यांचा पहिला मित्र राजेश त्यांच्याकडे वळत बोलतो, "बघा मित्रांनो, इंदूने आपल्याला स्टँडवर जाण्यासाठी ह्या बैलगाडीची सोय केली आहे.." राजेशच्या बोलण्याने तिघेही चकीत होतात.. कारण, त्यांना बैलगाडी तर दिसत होती पण इंदू कुठेच दिसत नव्हती..!!
"काय झालं रे..? असे का बघताय.?" मित्रांना गोंधलेलं पाहून राजेश विचारतो..
" बैलगाडी तर दिसतेय पण, इंदू कुठेय.?" सागर आश्चर्याने विचारतो..
"अरेरे, हि काय इंदू बैलगाडीजवळंच तर उभी आहे " असं बोलत राजेश मागे नजर वळतो.. त्यासरशी त्याला एक जोरदार धक्का बसतो.. कारण, तिथे नुसती बैलगाडीच उभी होती.. इंदू तर आसपास कुठेच दिसत नव्हती..!! काही सेकंदापुर्वीच तर ती इथे होती मग आता ऐवढ्या लगेच अशी कशी काय गायब झाली..? राजेश स्वतःच्याच मनाला विचारू लागतो.. शेवटी स्वतःचीच समजूत काढत, गेली असेल घरी असं मनाला पटवून देत तो ह्या विषयाला बगल देतो.. आता पाच वाजत आले होते.. त्यामुळे पटापट आवरून ते गाडीत येवून बसायला लागतात.. तेव्हा "अरेरे.. पण, बैलगाडी हाकणारा कुठेय.? इंदूने तर नुसती बैलगाडीच दिली आहे. गाडीवान कुठेय.? " त्यातला तिसरा नराधम वसंत खिजगणीतून सुटलेल्या समेस्येकडे सर्वांचं लक्ष्य वेधतो.. " गाडीवान हवाय व्हय.? मग म्या कोण हाय.?" एक भारदस्त आवाज अचानक त्यांच्या कानावर दनकन येवून आदळतो..!!

क्रमश:

लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh


DMCA.com Protection Status

Thursday, June 29, 2017

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part )

समीरच्या डोळ्यांत मांत्रिकाला जे काही दिसलं त्याने मांत्रिकाच्या डोळ्यांतील बुब्बुळेच पार दिसेनाशी करून टाकली होती.. अचानक हळू-हळू मांत्रिकाचं साधारण रूप बदलायला लागलं.. अन सर्वांची नजर मांत्रिकावर जावून खिळली.. अर्धा टक्कल पडलेल्या त्याच्या डोक्यावर आता अर्धवट जळालेली केसं उगवायला लागली होती.. ती केसं वाढत जावून गुडघ्यापर्यंत रेंगाळायला लागली.. घरातील इतर मंडळींचा ह्यावर विश्वासंच बसत नव्हता.. प्रत्यक्ष डोळ्यांदेखत घडत असूनदेखील ते मानायला त्यांचं मन धजत नव्हतं.. पण, सर्व परिस्थिती समोर होती आणि जे घडत होतं ते सत्य होतं.! अर्धवट जळालेल्या केसांआडून दिसणारा मांत्रिकाचा चेहरासुद्धा आता स्त्रीरूपात बदलला होता.. त्या जळालेल्या चेह-यामधून ठिकठिकाणांतून रक्ताने माखलेली कातडी लटकत होती.. चमकदार मोत्यांच्या दातांऐवजी आता जळून काळेठिक्कर पडलेले दात दिसायला लागले होते.. जी पाहताच छातीत धडकी भरत होती.. असा तो विद्रुप चेहरा बघितल्यावर सा-यांनी एकसाथ भितीने जोर-जोरात किंकाळ्या फोडल्या.. बदलत्या क्षणासोबत त्या मांत्रिकाचं रूपही बदलत चाललं होतं.. एव्हाना घराबाहेरचं वातावरणसुद्धा बदललं होतं.. शुभ्र पांढ-या ढगांची जागा आता काळ्याकुट्टं ढगांसोबतंच कडाडणा-या विजांनी घेतली होती.. मंदं वाहणारी हवासुद्धा घराच्याभोवती आता जोरात वाहू लागली होती.. दारे खिडक्या एकमेकांना धडाधड आपटत होते.. घराबाहेर अचानकंच जमलेले कुत्रे वर काळ्याकुट्टं ढगांकडे बघत एका विचित्र सूरात ईवळायला लागले होते.. पूर्ण वातावरणंच झटक्यात बदललं होतं..!!

बाहेरचं वातावरण जेवढं भयंकर होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने घराच्या आतलं वातावरण झालं होतं.. कारण, मांत्रिकाचं शरीर आता पूर्णपणे एका विद्रुप दिसणा-या स्त्रीच्या रूपात बदललेलं होतं.. ती विद्रुप बाई बुब्बुळे नसल्याने पांढरे पडलेल्या डोळ्यांनी सर्वांकडे चेहरा वेडा वाकडा करून बघत होती.. अचानक बाजूलाच खाटेवर बेशुद्धावस्थेत पडलेल्या समीरकडे तिची मान वळली आणि त्याच्या दुस-याच क्षणाला लगेचंच समीर शुद्धीवर आला.. समीर शुद्धीवर आला ह्याचा आनंद साजरा करायचा की पुढ्यात उभी असलेली ही विद्रुप दिसणारी बाई बघून दुखवटा करायचा.? अशी दुहेरी मनस्थिती घरातल्या मंडळींची त्यावेळेस झाली होती.. समीरला इथे कसा आलो हे समजत नव्हतं.. तो डोळे चोळत समोर बघतो तेव्हा त्याला प्रसाद आणि त्याच्या घरातील इतर मंडळी दिसतात..विजा कडाडण्याचा, दारे खिडक्या हवेमुळे धडाधड आपटण्याचा आणि कुत्रे ईवळण्याच्या आवाजाकडे त्याचं जराही लक्ष जात नाही.. कारण, घरातील सर्वांना बघून समीरला हायसं वाटत होतं.. गावात आल्यापासून त्याला फक्त आणि फक्त अतृप्त आत्मेच दिसले होते.. त्यामुळे साहजिकंच जिवंतं माणसं बघून त्याच्या भेदरलेल्या मनाला एक विलक्षण शांती मिळाली होती.. पण, ती शांती काही क्षणातंच त्याच्या चेह-यावरून मावळते.. कारण, प्रसादसोबतंच त्याचा पूर्ण परिवार घराच्या कोप-यात उभे राहून भितीने नुसते थरथर कापत होते.. त्या सर्वांना भितीने थरथर कापताना पाहून तो थोडा गोंधळतो.. त्याच गोंधळलेल्या अवस्थेत तो सर्वजण भितीने ज्या खाटेशेजारी बघत असतात तिथे हळूच नजर वळवतो.. त्याची नजर आधी जमिनीवर जाते.. आणि सर्वांत आधी त्याला दिसतात जळालेले मानवी पाय.. ते पाय बघून त्याला वर बघण्याची हिंम्मतंच होत नाही.. तश्याच अवस्थेत तो खाटेच्या दुस-या बाजूने उडी मारून तडक प्रसादला खेटून उभा रहातो.. चेहरा तळहातामध्ये लपवून तो थरथरायला लागतो.. तेव्हा ऐवढा वेळ नुसतं वेडी वाकडी मान फिरवून उभी असलेली ती बाई घोग-या भसाड्या आवाजात विक्षिप्त हसत बोलते, " समीर.. घाबरलास काय रे मला.. अशी नजर का लपवतोयस.. बघ माझ्याकडे.. मी सावित्री.. हाहाहाहाऽऽ.." सावित्री नाव ऐकताच समीरचे डोळे चमकतात.. आपोआपच त्याची नजर तिच्या दिशेने वळते.. आणि मग तिचं ते विद्रुप रूप पाहून तोंडातून पटकन शब्द बाहेर पडतात.. " हाच तो जळालेला चेहरा आहे जो मला मोबाईलमध्ये दिसला होता.. हो हिच आहे ती सावित्री जिला काल रात्री मी स्डँडजवळ पाहिली होती.." सगळे समीरकडे आ वासून बघायला लागतात.. समीर असा बहेकल्यावाणी का बोलतोय हे त्यांना कळत नव्हतं.. साहजिकंच त्यांना त्यामागचं खरं कारण अजूनंही कळलं नव्हतं.. हा गुंता आता जास्तंच वाढत जात होता.. शेवटी आजीने पुढाकार घेवून तिचे सुरकुतलेले हात सावित्रीपुढे पसरले.. थकलेले गुडघे जमिनीवर कसेबसे टेकवले आणि थरथरत्या आवाजात तिला साकडं घालू लागली. " आम्हच्या जीवाला ह्यो असा घोर कशापायी लावून ठेवलंसा.. ह्या गरीब पोराच्या मागं का ऐवढी पडलीस.? काय पाईजिल तुला..?? " आजी होता नव्हता सर्व जोर काढून बोलली.. थोडावेळ घरात शुकशुकाट पसरला.. बाहेरचा आवाजसुद्धा अचानक शांत झाला..ऐवढ्या शांततेत एकमेकांच्या श्वासोच्छवासाचा आवाजसुद्धा पुर्ण घरभर पसरत होता.. ह्यादरम्यान कोणीच एकही शब्द तोंडातून काढला नाही.. ती विद्रुप बाईसुद्धा शरीर थंड पडल्यागत शांत उभी होती..पण ही शांतता बरंच काही राहून गेलेलं सांगण्यासाठी स्वतःला कदाचित सज्ज करत होती.. आणि झालंही अगदी तसंच.. ऐवढावेळ शांत उभी असलेली ती तिच्या भसाड्या घोग-या आवाजात अंगाला शहारे आणणारा एक शब्द उच्चारते.."सूऽऽऽड.." तिने हा शब्द उच्चारला आणि अचानक तिच्या शरीरातून मांस जळलेला उग्र वास यायला लागला.. सर्वांचेच हात आपोआपंच आपआपल्या नाकांवर गेले.. पण, तिच्या भितीने ते लगेचंच खाली आले... आगीच्या एका छोट्याश्या ठिणगीने तिच्या पायाचं मांस जाळायला सुरूवात केली होती.. त्यामुळे तो उग्र वास येत होता आणि हळूहळू घरभर पसरत होता..!!

बाहेरचा थांबलेला आवाज आता पुन्हा यायला लागला.. विजांचं कडाडणं.., दारा खिडक्यांचं आपटणं.. कुत्र्यांचं ईवळनंही परत एकदा सुरू झालं होतं.. आवाजांच्या ऐवढ्या कलकलाटातही तिचा तो घोगरा भसाडा आवाज परत सर्वांच्या कानावर येवून आदळला.. " समीरऽऽ.. तुझ्यासोबत आणि तुझ्यासमोर रात्री जे काही घडलं होतं त्यामागचं खरं कारण आता मी तुझ्याबरोबरंच ह्या खोलीत असलेल्या ह्या सर्वांनाही सांगणार आहे.. पण एक गोष्ट लक्षात ठेवाऽऽ.. कोणीही ह्यादरम्यान तोंडातून एकही शब्द बाहेर काढता कामा नयेऽऽ.. कोणी चुकूनंही तसा प्रयत्न जरी केला तरी त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी स्वतःचा आवाज कायमस्वरूपी हरवून बसावा लागेलऽऽऽ हाहाहाहाऽऽऽ" ... तिच्या ह्या चेतावणीने सारेच स्तब्ध झाले... तिच्या आवाजामध्ये चिड होती, वेदना होत्या, एक अनामिक भिती होती आणि राक्षसी हास्यसुद्धा होतं... ती परत तिच्या घोग-या भसाड्या आवाजात बोलू लागली.. तिची काळाच्या पडद्याआड लपलेली कहाणी सांगू लागली..!!!

माझं पूर्ण नाव सावित्री खाशाबा टिके.. ह्याच गावची.. ही गोष्ट आहे सत्तर- ऐंशी वर्षांपूर्वीची.. मी जवळपास चार वर्षांची असेल त्यावळेस जेव्हा माझ्या वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.. वडील आम्हाला सोडून गेले पण त्यांच्या अश्या अचानक जाण्याचं दुःखं आई सहन करू शकली नाही.. तिला मानसिक धक्का बसला आणि ती वेडी झाली.. त्या वेड्याच्या भरात ती पूर्ण गावभर फिरत रहायची.. येणा-या जाणा-यांकडे मळकट फाटलेला पदर पसरून पैसे मागायची अन मिळालेले पैसे कर्जदारांच्या दारात जावून फेकायची.. असंच एकदा ती गावात भटकत असताना जी चूकून गावाबाहेर गेली ती परत कधी माघारी आलीच नाही.. त्या दिवसापासून तिला गावात फिरताना कोणीच पाहिलं नाही.. काही देव माणसांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला.. पण.. सारंच व्यर्थ.. ती सापडली नाही आणि माझ्या नशिबात चौथ्या वर्षीच अनाथाचं आयुष्य जगण्याची वेळ आली.. कर्जबाजारामुळे घरदारासोबत जे काही होतं नव्हतं ते सगळं कर्जदारांनी ताब्यात घेतलं.. त्यामुळे मीसुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार फिरू लागली.. गरीब अनाथ मुलगी म्हणून रोज कोणी ना कोणी घरातलं उरलं सुरलं मला खायला देत होते.. त्याने पोट भरत नसलं तरी जगण्यासाठी तेवढं पूरेसं होतं.. दिवसांमागून दिवस गेले.. माझा दिनक्रम तसाच चालू होता.. मग एकेदिवशी गावात मुंबईला राहणारा माझा लांबचा काका आला.. त्याने मला त्याच्यासोबत मुंबईला नेलं.. ब्रम्हचारी असल्यामुळे काकांनी लग्न केलं नव्हतं.. सांगायला असं त्याचे सगेसोयरे कोणीच नव्हतं.. त्यामुळे आम्हा दोघांनाही एकमेकांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं.. काकांनी माझा मुलीगत सांभाळ केला.. मला चांगलं शिक्षण दिलं.. मी पदवीधर झाले अन एका चांगल्या हुद्दयावर कामाला लागले.. तोपर्यंत काका आजारपणामुळे पार खंगून गेले होते.. शेवटी काही महिन्यांनी त्यांना मरण आलं.. आणि मी परत एकदा अनाथ झाले..!!

काकांच्या मृत्युनंतर मी एकटी पडली होती.. सकाळ कामानिमित्त बाहेरंच जात असल्यामुळे काही वाटायचं नाही.. पण, रात्रीचं मात्र घर खायला उठायचं.. रोजचा तोच तो एकटेपणा आता नकोसा वाटत होता.. अश्याच एका रात्री मी एकटेपणाला कंटाळून बिछाण्यावर सारखी कूस बदलत झोपण्याचा प्रयत्न करत होती.. तेव्हा काय माहीत पण अचानक गावाकडचं आयुष्य डोळ्यांसमोर घर करू लागलं.. मला आई दिसायला लागली.. तिला मानसिक धक्क्यानं आलेलं वेडेपण दिसू लागलं आणि त्याच भरात ती गाव सोडून गेल्याचंही आठवू लागलं.. जुन्या आठवणी डोळ्यांपुढे आल्या आणि त्याच आठवणींत मी बैचेन मनाने झोपी गेले.. पण, रात्री अचानक भितीने दचकून जागी झाली.. घड्याळाकडे बघितलं तर एक वाजून गेले होते.. अंगाला दरदरून घाम फुटला होता.. छाती भितीने जोरात धडधडत होती.. तोच चेहरा इतक्या वर्षांनी आज एवढा स्पष्टपणे दिसला होता.. कपाळभर विस्कटलेलं कुंकू होतं..काळेभोर टपोरे डोळे सैरावैरा भिरभिरंत होते.. गळ्यात तुटून लटकत असलेलं मंगळसूत्र.. अंगावर मळकट साडी आणि हातात तुटलेल्या बांगड्यांचं अवशेष.. होय..ती माझी आई होती.. असाच काहीसा अवतार होता तिचा बाबांच्या मृत्युनंतर.. ती पहिल्यांदाच माझ्या स्वप्नात आली होती.. मला परत गावाला बोलवत होती.." पोरी.. मला एकटीला टाकून तू मंबईला गेलीस..म्या तुजी आजपतूर गावाकडं वाट बघतीय.. ये.." तिचं काळजाला पिळून टाकणारे शब्द त्या रात्री सतत कानात घुमत होते.. आई खरंच असेल का..?? ती अजूनंही माझी वाट बघत असेल का..?? त्यावेळी प्रश्न तर डोक्यात खुप सारे होते आणि त्याचं उत्तर मला फक्त गावाकडेच मिळणार होतं.. म्हणून मी ठरवून टाकलं.. सकाळी मिळेल त्या एसटी ने गावाला जायचं.. आणि आईला शोधायचं...

(क्रमशः)


लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh


DMCA.com Protection Status

Monday, June 19, 2017

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part )

कांदा लावा ह्याच्या नाकाला...
नाही.. कांदा नको चमड्याची चप्पल लावा नाकाला..
डाॅक्टरांना फोन करून तास उलटून गेला पण डाॅक्टरांचा अजून पत्ता नाहीए.. घरात नुसती सर्वांची धावपळ चालली होती.. समीरला शुद्धीवर आणण्यासाठी सर्वजण आप-आपल्या परीने उपाय सुचवत होते.. समीर जेव्हा त्या बसस्टाॅपजवळ बेशुद्धावस्थेत पडला होता तेव्हा ह्याच लोकांनी त्याला त्यांच्या घरी आणलं होतं.. ही मंडळी तिच होती ज्यांच्याकडे समीर लग्नासाठी आला होता.. होय, हे त्याच्या मित्राचंच घर होतं..!! त्याचा मित्र प्रसाद डाॅक्टरांची वाट बघत-बघत घराच्या ह्या कोप-यापासून त्या कोप-यापर्यंत बैचेन होवून येरझ-या मारत होता.. बाकीचे घरातील मंडळी त्यांना होईल तसं प्रयत्न करून समीरला शुद्धीवर आणण्याचा खटाटोप करत होते.. पण, काही केल्या कोणाच्याच प्रयत्नांना म्हणावं तसं यश येत नव्हतं.. घरात लग्नाचं वातावरण आणि त्यात असलं अपशकून, ह्यामुळे घरातील जुनी जाणती लोकं चिंतेत पडली होती.. मग नं रहावून शेवटी त्यांच्यातल्याच एका आजीबाईने त्यांना मांत्रिकाला बोलवायला सांगितलं.. साहजिकंच घरातल्या शिक्षित मंडळींनी ह्याला विरोध दर्शवला..
प्रसादसुद्धा आजीवर चिडलाच, " हे मांत्रिक-बाबा वगैरे बोगस असतात आजी.. ह्याला डाॅक्टरांनाच दाखवावं लागेल.. तुमचा मांत्रिक काही करू शकणार नाही ह्यामध्ये.." प्रसादच्या खेकसण्याने आजी जरा हिरमुसली पण तरीही ती तिच्या मताशी अगदी ठाम होती.. " तुम्ही आजकालची पोरं..चार बुकं काय वाचली स्वतःला देवंच समजाया लागताय..पण पोरा, हे संमधं दिसतंय तेवढं साधं न्हाय..ऐक माझं.." आजी पार हृदयापासून बोलत होती.. घरातील काही मंडळींना हे पटत होतं.. कारण, त्यांनाही गावाकडची परिस्थिती चांगलीच माहीत होती.. पण, प्रसादला हे सर्व बालिशपणाचं लक्षण वाटत होतं.. त्याचं भूत-प्रेतांवर जराही विश्र्वास नव्हता.. त्यामुळे मांत्रिकाला बोलावण्यासाठी त्याचा साफ विरोध होता आणि त्याने तसं घरच्यांना खडसावून सांगितलंदेखील.. घरातली मंडळी हे कधीच प्रसादच्या बोलण्याबाहेर जात नसत.. त्यांना त्याचा स्वभाव चांगलाच माहिती होता.. डाॅक्टर अजून कसे आले नाहीत ह्या विचाराने तो बैचेन होत होता..
"अरेऽऽ..परत एकदा त्या डाॅक्टरला फोन करून बघ ना, कुठपर्यंत पोहोचलेत ते तरी समजेल.." त्याचे वडील आता नं रहावून बोलले.. प्रसादने डाॅक्टरांना फोन करण्यासाठी मोबाईल खिशातून काढला.. अन फोन लावणारंच होता की तेवढ्यात मागून कोणीतरी ओरडलं, "ते बघा, डाॅक्टरसाहेब आले.." प्रसाद पटकन पुढे होवून डाॅक्टरांच्या हातातील बॅग घेत बोलतो, " काय डाॅक्टर, किती ऊशीर..माझा मित्र बघा अजून शुद्धीवर आला नाहीए.." डाॅक्टर त्याला शांत करत समीरच्या दिशेने येतात.. समीरच्या खाटेशेजारच्या स्टूलवर बसून ते त्याला तपासायला लागतात.."हम्म..हार्ट रेट खुप वाढला आहे आणि शरीरसुद्धा थंडं पडलं आहे.. कदाचित खुप घाबरल्यामुळे त्याला चक्कर आली असावी.. मी गोळ्या देतो लिहून ते वेळेवर द्या.. येईल शुद्धीवर .. एक इंजेक्शन देतो मी आता ह्याला.. त्याने जरा बरं वाटेल.." डाॅक्टर इंजेक्शनची तय्यारी करतंच बोलतो..
"डाॅक्टर, घाबरण्यासारखं काही कारण नाहीए ना..??" प्रसाद थोड्या दबक्या आवाजात डाॅक्टरांना विचारतो..
"नाही नाही.. घाबरण्याचं काही कारण नाहीए.. मी इंजेक्शन दिलंय.. तेव्हा आराम करू द्या ह्यांना.. होतील बरे.." डाॅक्टर प्रसादला धीर देत बोलतो.. हातात औषधांची चिठ्ठी देवून डाॅक्टर निघून जातात.. प्रसाद ती चिठ्ठी बंड्या काकांना देवून औषधे आणायला पाठवतात.. सर्वजण समीरच्या खाटेशेजारी जमा होतात.. सर्वांच्याच चेह-यावर एक भिती स्पष्ट जाणवत होती..
" ऐवढा लांबून आपल्या इथे लग्नकार्यासाठी आला बिच्चारा आणि हे काय होवून बसलं बघा.." प्रसादची आई कपाळावर हात ठेवून पुटपुटते..
"काय रे प्रसाद , तुझा मित्र तर येणार नव्हता ना लग्नाला.. मग हा असा अचानक कोणालाही नं कळवता कसा काय आला??" प्रसादचे वडील आश्चर्याचा सूर आणत विचारतात.. प्रसादच्या डोक्यातही खरं तर हाच विचार कधीपासून घोळत होता.. कारणही तसंच होतं.. जेव्हा समीरला लग्नाचं निमंत्रण दिलं होतं तेव्हा त्याने येण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता.. ऑफिसमधून सुट्टी भेटणार नाही असलंच काहीतरी कारण त्याने सांगितलं होतं.. मग असं असताना हा असं नं सांगता अचानक कसा काय आला..?? समीर तर कधी अश्या प्रकारचा हलगर्जीपणा कधीच करत नाही.. मग ह्यावेळेस त्याने काही नं कळवता कसा काय आला..?? "अरे बोल की प्रसाद.." प्रसादचे वडील खेकसावून बोलतात.. प्रसाद त्यांच्या खेकसवण्याने विचारांच्या गुंतागुंतीमधून दचकून बाहेर येतो..
"मलाही काही कळत नाहीए बाबा.. लग्नाला येणार नाहीए हे त्याने मला आधीच कळवलं होतं.. मग असा अचानक.." प्रसाद बोलता-बोलता पुन्हा विचारात जातो..
"माझं येका पोरांनो, त्या मांत्रिकास्नी निरोप धाडा.. त्योच सांगल संमदं.. ह्यो गुंता डाक्टराच्या अवसंधानं सुटायचा न्हाय.."
आजी पुन्हा जीव ओतून बोलली.. समिरसुद्धा अजून शुद्धीवर आला नव्हता.. डाॅक्टरांच्या औषधांचा म्हणावा तसा परिणाम त्याच्यावर झाला नव्हता.. आणि त्यातंच लग्नसुद्धा दोन दिवसांवर येवून ठेपलं होतं.. म्हणून मग शेवटी नाईलाजाने प्रसाद आजीचं बोलणं ऐकून मांत्रिकाला आणण्यासाठी राजी होतो.. बंड्याकाका तडक उठून कोणी सांगाण्याच्या आधीच मांत्रिकाला बोलवायला निघून जातात..!!

काही वेळाने बंड्याकाका मांत्रिकाला घेवून येतात.. त्या मांत्रिकाला पहिल्या नजरेत बघितल्यावर तो खरंच मांत्रिक आहे का असा प्रश्न प्रसादच्या डोक्यात आला.. कारण, ह्या मांत्रिकाचा वेश तसा नव्हता जसा मूव्हीजमध्ये दाखवतात.. गळ्यात कवट्यांची माळ, अंगावर काळी कपडे, लांब-लांब केसं आणि कपाळावर अंगारा मळलेला काळाकुट्टं चेहरा.. ह्यापैकी काहीच नव्हतं.. ह्याचा वेश तर एखाद्या साध्या माणसासारखाच होता.. त्याने अंगावर सफेद रंगाचा फुल हाताचा शर्ट आणि काळी पँट घातली होती.. अंगाने तो थोडा भरभक्कमंच होता.. डोळ्यांत एक वेगळाच तेज होता त्याच्या.. " या या बुवा.. आता तुम्हीच हा गुंता सोडवू शकता.." प्रसादचे वडील अगतिक होवून मांत्रिकाला बोलले.. मांत्रिक काहीच नं बोलता सरळ समीरजवळ आला.. त्याने सोबत आणलेला अंगारा हाताच्या मुठीत घट्ट पकडून कसला तरी मंत्र पुटपुटतो.. मग झपकन डोळे उघडून ती अंगा-याने भरलेली मुठ समीरच्या कपाळावर मळतो.. आता पुढे काय होणार ह्या आशेने सर्वजण श्वास रोखून पहायला लागतात.. अंगारा कपाळावर मळल्याबरोबर समीरच्या शरीराला एक जोरदार झटका बसतो.. आणि त्या आकस्मित झटक्याबरोबरंच त्याचे डोळे झपकन उघडतात.. समीरचे डोळे आता पुर्ण पांढरे झालेले होते.. हा नजारा बघून घरातली मंडळी हादरून जातात.. प्रसादसुद्धा डोळे फाडून ते सारं पहात होता.. मांत्रिक आता समीरच्या डोळ्यांत पहायला लागतो.. त्याची नजर समीरच्या डोळ्यांत काहीतरी शोधत असते.. आणि थोड्याच वेळात त्या मांत्रिकाला ते दिसतं ज्यामुळे हे सर्व घडलं असतं..

क्रमशः

लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh



DMCA.com Protection Status

Thursday, June 15, 2017

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part )

अगदी हाॅरर मूव्हीसमध्ये दाखवल्याप्रमाणे ती मुलगी त्याच्यासमोरून एका झटक्यात गायब झाली होती.. आपण ह्या गावात येवून खरंच खुप मोठी चूक केली हे पदोपदी त्याला जाणवत होतं.. ST मधून उतरताना त्या म्हाता-या माणसाचं ऐकलं असतं तर ह्या फंद्यात अडकलोच नसतो..!! कुठे अडकून टाकलं मी स्वतःला नसत्या भानगडीत.. देवाऽऽ मला ह्यातून सुखरूप बाहेर काढ.. प्लीजऽऽ.. स्वतःच्या कमनशीबी पणाला दोष देत तो देवाचा धावा करू लागतो.. हनुमान चालीसा म्हंटल्याने भूत-प्रेत आपल्या समोर येत नाहीत हे आठवल्यावर तो हनुमान चालीसा येत नसतानाही तुटक्या-फुटक्या शब्दांत जमेल तसं बोलायला लागतो..हनुमान चालीसीचा आवाज ह्या सुमसान वाटेत आस-पास घुमायला लागला.. हनुमान चालीसीमुळे त्याला आता थोडं हायसं वाटत होतं.. एक आधार वाटत होता जो त्याला ह्या क्षणी खुप महत्त्वाचा होता.. काही वेळ असाच हनुमान चालीसेच्या घुमणा-या आवाजात गेला.. पण, ही काळरात्रं त्याला अशी सहजासहजी सोडणारी नव्हती..!! पुढे काय घडणार ह्याची साधी पुसटशी कल्पना नसतानाच अचानक त्याच्या कानाला पुन्हा कोणाचा तरी आवाज ऐकू येतो.. ह्यावेळी आवाज कोणत्या स्त्रीचा नव्हता तर काही माणसांचा होता..!! ते आपआपसांत काहीतरी बडबडंत होते.. समीर ह्या अनपेक्षीत आवाजाने हनुमान चालीसा बोलणं थांबवतो आणि तो ऐणारा आवाज नीट कान देवून ऐकू लागतो.. आवाज तर तीन-चार जणांचा येत होता..!! ती माणसं कसल्यातरी विषयावरून कुजबूजंत होती.. पण नक्की काय बोलत होती हे त्याला स्पष्ट ऐकू येत नव्हतं.. तो आवाजाच्या दिशेने हळू-हुळू पावलं वळवतो.. मनातल्या मनात हनुमान चालीसा सुरू झाली होती बोलायला.. ऐवढ्या गारठवणा-या थंडीतही तो भितीमुळे घामाने ओलाचिंब झाला होता..!! खिशातला रूमाल काढून तो जमेल तेवढा घाम आधीच घामाने भिजलेल्या रूमालाने टिपत होता..

समीर आता त्या आवाजाच्या दिशेने थोडा पुढे सरकत होता.. जस-जसा तो आवाजाच्या दिशेच्या जवळ पोहचायला लागला तस-तसा त्याला अस्पष्ट येणारा आवाज थोडा स्पष्ट यायला लागला होता.. सावध पावलं टाकत तो शक्य तेवढं त्या आवाजाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता.. पण, अचानक समीरचे पावलं जागच्या जागीच खिळली जेव्हा त्या कुजबूजणा-या माणसांपैकी कोणी एकाने सावित्रीचं नाव घेतलं..!! थोडा वेळ तर त्याला त्याच्या कानावर विश्र्वासंच बसला नाही.. कदाचित सावित्री नाव सारखं डोक्यात घोळत असल्यामुळे आपल्याला चूकून तिचंच नाव त्यांच्याकडून ऐकण्यात आलं असावं असं त्याला वाटायला लागलं.. पण नाही.. त्याने चूकून सावित्रीचं नाव नव्हतं ऐकलं.. ना ही त्याचा तो भ्रम होता.. तर खरंच त्या माणसाने सावित्रीचंच नाव घेतलं होतं.. समीरला ह्याची खात्री तेव्हा झाली जेव्हा त्यांच्यातलंच कोणी दुसरा माणूस सावित्रीच्या नावाचा उल्लेख करून बोलला, "सावित्रीला आज सोडायची नाही आपण.. सालीने गावात जावून आपल्या नावाने बोभाटा करण्याच्या आधीच संपवून टाकूया तिला.." तो माणूस आवाजामध्ये जरब आणून बोलत होता.. समीरला काय करावं काहीच कळत नव्हतं.. त्याला एकट्याला ह्या सर्वांना थांबवणं शक्यच नव्हतं.. त्यात कोणाची मदत घ्यायचं म्हंटलं तर दूर दूरपर्यंत चिटपाखरूसुध्दा नव्हतं.. अश्यात जे काय करायचं ते त्याला स्वतःलाच करायचं होतं आणि तेही शांत डोकं ठेवून.. त्यामुळे तो आता त्या माणसांवर नजर ठेवायचं ठरवतो.. पण, नजर ठेवायची तरी कशी..?? कारण, त्या माणसांचा आवाज तर ऐकू येत होता पण, ती माणसं आसपास कुठेच दिसत नव्हती..!! आवाज हा तर अगदी त्याच्या समोरूनंच ऐकू येत होता, पण दिसत मात्र कोणीच नव्हतं..!! अंधार जरी जास्तं असला तरी तिथे लपण्यासाठी कोणती खास जागा नव्हती.. त्यामुळे कोणी झाडा-झुडपाआड लपून बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.. अचानक समीरच्या डोक्यात एक शंकेची पाल चूकचूकली.. ती माणसं सावित्रीच्या नावाचा उल्लेख करत होते.., ती सावित्री मला whatsappवर मॅसेज पाठवत होती.., नंतर तिचा चेहरादेखील दिसला होता.., मग ती अर्धनग्न बाई दिसून गायब झाली..आणि आता ही माणसं.. ह्या सर्वांचा परस्पर काहीतरी संबंधं नक्कीच असणार.. कोणाचा आवाज येतोय तर कोणी समोर येवून अचानक गायब होतोय..!! हे सर्व अतृप्त आत्मेच आहेत.. जे इथे मुक्तीसाठी भटकत आहे.. ह्या अतृप्त आत्म्यांमुळे समीरची छाती भितीने वर खाली होत होती.. त्याच्या आयुष्यात असं काही घडेल हे त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं...!!!

रात्रं जवळ-जवळ ढळायला आली होती.. समीर वर आकाशाकडे बघायला लागतो.. अंधाराची शाल हटून आता तिथे उजेडाची हलकीशी सोनेरी किनार दिसायला सुरूवात झाली होती.. थोड्याच वेळात सुर्योदय होईल ह्या आशेने समीरच्या जीवात जीव आला होता.. पण.. सुर्योदयाला अजून थोडा अवकाश बाकी होता.. त्यामुळे तो जेवढं शक्य होईल तेवढं भरभर पळत ह्या जागेपासून दूर जायचा प्रयत्न करत होता.. पण, इथे मात्र घडलं उलटंच..!! ऐवढं धावूनसुद्धा समीर आता परत त्याच बस स्टाॅपजवळ येवून पोहोचला होता.. ते बस स्टाॅप बघून तो जोरात कपाळावर हात मारतो.. ज्या बस स्टाॅपपासून हे सर्व सुरू झालं होतं बरोबर तिथेच त्याला कोणत्या तरी अदृश्य शक्तीने आणलं होतं..!! सर्वच भयानक आणि अंगाला कापरं भरवणारं होतं.. हि भिती आता त्याच्या मनावर खोल घाव करत होती.. तो ह्या निर्जण आडवाटेवर धाय मोकलून रडायला लागतो.. त्याची मानवी बुद्धी हे सर्व समजण्यासाठी सक्षम नव्हती.. कारण, हे सर्व शैतानी शक्तींचं काम होतं आणि ही शक्ती साधारण मनुष्याच्या बुद्धीला पेलवणारी नव्हती.. हा सर्व प्रकारंच अकल्पणीय आणि तेवढाच भयानक होता..!! हातांनीच डोळ्यांतून निघणा-या पाण्याला थांबण्याचा प्रयत्नात असताना त्याची नजर त्याच्यापासून सहा-सात पावलं अंतरावर असणा-या बस स्टाॅपजवळच्या बाकड्याकडे जाते.. तेव्हा त्याला तिथे एक आकृती दिसते.. डोळ्यांतलं पाणी हाताने नीट पुसून तो परत निरखून बाकड्याजवळ बघायला लागतो.. बघता-बघता तिथे अजून चार आकृत्या दिसायला लागतात..!! जी पहिली आकृती त्याला दिसली होती ती एका स्त्रीची वाटत होती.. आणि बाकीच्या आकृत्या ह्या माणसांगत दिसत होत्या..!! त्या माणसांच्या शैतानी आकृत्या त्या स्त्री आकृतीचे केसं पकडून, तिला जमिनीवर पाडून फरफटत बाकड्यापाशी आणतात.. आणि मग त्यांच्यातली एक शैतानी आकृती सु-यासारखा कसला तरी हत्यार काढून सरळ तिच्या पोटात घुसवतो..!! हत्यार पोटात घुसताचक्षणी त्या स्त्री आकृतीच्या तोंडातून एक काळजाला चिरून टाकणारी किंकाळी बाहेर पडते.. आणि त्या किंकाळीबरोबरंच समीरही भितीने पाढराफिट्टं होवून उभा असलेल्या जागेवरंच चक्कर येवून धाडकन खाली कोसळतो..!!

क्रमशः


लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh



DMCA.com Protection Status

Monday, June 12, 2017

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part )

त्या कुत्र्यांचं असं घाबरून पळून जाण्याचं काही कारण समीरला कळत नव्हतं ...पण, त्यांच्या पळून जाण्याने आता मात्र तो जवळ-जवळ भितीने चक्कर येवुन कोसळणंच बाकी होतं ...कुत्र्यांना असं नेमकं काय दिसलं तिथे की, ते असे शेपूट घालून सुसाट पळत सुटले..!!! असं बोललं जातं की, कुत्रे आणि इतर जनावरांना मनुष्याच्याही आधी, कोणती काही अघटित घडणार असेल तर त्यांना दिसतं..!! एखादी अदृश्य शक्तीसुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाही.. त्या कुत्र्यांनासुद्धा काहीतरी नक्कीच दिसलं असणार.. समीरनेसुद्धा असल्या गोष्टी त्याच्या आजीकडून ह्याआधी ऐकलेल्या होत्या.. त्यावेळेस ऐकताना तो आजीची फिरकी घ्यायचा..पण, आता प्रत्यक्ष जे तो अनुभवतोय, त्यावरून त्यामध्ये काही ना काही तथ्य असणार, ह्याची त्याला पुरेपूर खात्री झाली होती..

एव्हाना त्याला कळून चुकलं होतं की, आपल्यासोबत जे होतंय त्यामागे भूताटकीचाच प्रकार असणार.. त्यामुळे काहीही होवू दे.. गाडी भेटू वा ना भेटो.. कोणी न्यायला येवो वा ना येवो.. पण आता एक क्षणसुद्धा इथे काढायचा नाही हे त्याने मनोमन ठरवून टाकलं .. चेह-यावरून ओथंबळणारा घाम रूमालाने टिपत तो कुत्रे जिथे बघून भितीने पळत सुटले होते, त्या दिशेने तो जाता-जाता शेवटची एक चोरटी नजर टाकतो.. का कोणास ठाऊक पण, त्याला आतून असं सारखं वाटत होतं की, आता आपल्याला इथे काहीतरी नक्कीच दिसेल.. त्यामुळे तो तिथेच एकटक नजर रोखून धरतो.. रात किड्यांचा आवाज त्या क्षणाला अजूनंच भयानक बनवत होता.. त्यात हा काळाकुट्टं अंधार आणि निर्जण स्थळ, ह्यामुळे तिथे कोणालाही नकोशी वाटणारी भयाण शांतता पसरली होती..!! काही सेकंद नजरेने शोधाशोध करूनही त्याला तिथं तसं घाबरण्यासारखं काही दिसलं नाही.. म्हणून मग तो तसाच माघारी फिरून बस स्टाॅपच्या बाकड्यावर ठेवलेली बॅग घ्यायला जातो.. त्याच्या डोक्यात अजूनही खुप सारे शंका कु शंका घोळत असतात.. मित्रांकडून ऐकलेल्या भूता-खेतांचे किस्से-कहाण्यासुद्धा राहून-राहून आता त्याच्या नजरेसमोर येत होत्या... त्यात मोबाईलवरचा सावित्री नावाच्या अनोळखी मुलीचा whatsapp मॅसेज अन थरकाप उडवणारा तिचा तो विक्षिप्त चेहरा आठवून तर त्याचा घसासुद्धा कोरडा पडू लागला होता..

बाकड्यावरची बॅग खांद्याला अडकवून तो तिथून काढता पाय घेतो.. समोर होती एक सुनसान काळीकुट्टं वाट.. ती वाट बघूनंच मन जायलासुध्दा धजावत नव्हतं.. पण, इथे थांबून भितीने मरण्यापेक्षा ही वाट चाललेलीच बरी हे ही त्याला माहीत होतं.. चालता-चालता आजूबाजूला नजर वळवत मध्येच मागे बघत, कोणी आपला पाठलाग तर करत नाही ना, ह्याची अधून-मधून खात्री करतंच तो पुढे जात होता.. काही पावलं चालल्यावर त्याच्या कानाला धावत येत असलेल्या पावलांचा हलकासा आवाज ऐकू येतो.. तो तसाच जागच्या जागी थांबून त्या आवाजाचा कानोसा घेवू लागतो.. तेव्हा लगेचंच त्याच्या पुढच्याच मिनीटाला समोर रस्त्याच्या आडवाटेवरून एक स्त्री अर्धनग्न अवस्थेत त्याला पळताना दिसते.. तिच्या अंगावर जे जेमतेम कपडे होते तेसुध्दा जागो जागी फाटलेले होते.. तिच्या चेह-यावरची भिती आणि डोळ्यांत मदतीची आस एवढ्या अंधारातही स्पष्ट दिसत होती.. समीर मदत करण्याच्या उद्देशाने तिच्या मागोमाग जातो.. अहोऽऽ थांबा.. घाबरू नकाऽऽ.. मी तुमच्या मदतीसाठी आलोय.. अहोऽऽ पळू नका अश्याऽऽ.. समीर अगदी घसा ताणून ओरडत असतो.. त्याचा आवाज ती ऐकते आणि जागच्या जागी थांबते.. समीरही मागोमाग येवून तिच्या समोर थोड्या दूर अंतरावर येवून थांबतो.. धावत आल्यामुळे त्याला धाप लागलेली असते.. कमरेत वाकून,गुडघ्यावर दोन्ही हात टेकवून..तिच्याकडे बघत, धापा टाकत.. बोलायला काही शब्द काढणार तितक्यात, ती त्याच्याकडे वळते.. समीर तिच्या असं अनपेक्षित वळण्याने थोडा दचकतो.. स्वतःला सावरत तो तिच्याकडे बघतो.. ह्यावेळी तिच्या चेह-यावरचे हावभाव पूर्ण बदललेले होते.. थोड्यावेळापूर्वी जी मुलगी स्वतःचा जीव मुठीत घेवून पळत होती, तीच मुलगी आता अशी खुनशी नजरेने त्याच्याकडे का बघत होती, हे त्याला समजलं नव्हतं.. तरीसुद्धा तो तिला हिंम्मत करून विचारू लागताच ती, जोरात किंचाळायला लागते.. आणि क्षणार्धात त्याच्या डोळ्यांदेखत गायब होते...!!!

- क्रमशः


लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh



DMCA.com Protection Status

Wednesday, June 7, 2017

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part )

खाली पडलेला मोबाईल घेण्याची हिम्मत आता समीरच्यात नव्हती. तो तसाच समोरच पडलेला मोबाईल नुसता भेदरलेल्या नजरेने बघत रहातो. मोबाईलची Caller tone तर सलग वाजतंच रहाते..त्या वाजणा-या tone ने त्याची अवस्था तर आणखीनच केवीलवाणी करून टाकली होती. रडवेल्या चेह-याने तो हे सारं पहात होता..थोड्या वेळाने Ring वाजून-वाजून मोबाईल पुन्हा Switch off होतो. आता कसलीच Ring आसपासची शांतता भंग करण्यासाठी वाजत नव्हती. क्षणार्धातंच तिथे भयाण शांतता पसरते. मग समीर खाली वाकून मोबाईल थर-थरत्या हाताने ऊचलतो. पण, नं बघताच मोबाईल तसाच खिश्यात टाकतो आणि पुन्हा बाकड्यावर येवून बसतो.

 तो जळालेला चेहरा, जळून कुरतळल्यागत झालेली केसं आणि त्यात ते तिचं विक्षिप्त  हसणं, हे सारंच समीरला आता डोळ्यासमोर दिसत होतं. भातीने घामाघूम झालेला समीर आता पार सुन्न झाला होता. तो कसलाच तर्क लावण्याच्या मनस्थ्तितीत नव्हता. बाकड्यावर बसून स्वतःचं डोकं पायामध्ये लपवून तो ओठांतल्या ओठांत काहीतरी पुटपुटायला लागतो. अर्थातच हे सारं तो भितीमुळेच करत होता. रात्रीचे आता अडीच वाजून गेले होते. काही वेळ तसाच शांततेत जातो. थोडा वेळ तसाच गेल्यानंतर अचानक कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू येवू लागतो. समीर कुत्र्यांच्या विचित्र रडण्याने दचकून जागा होतो. जाग आल्याबरोबरंच त्याला समोर रस्त्याच्या पलीकडे 3-4 कुत्रे दिसतात. ती एकसारखी एका ठराविक जागेकडे बघून रडत असतात,जसं काही तिथे कोणी ऊभा आहे. पण, समीरला तिथे कोणी असल्याचं दिसत नव्हतं. तरीसुद्धा तो तिथेच नजर रोखून पहात रहातो.. आता समीरला प्रत्येक क्षणाला कुत्र्यांच्या आवाजामध्ये चढ-उतार जाणवायला लागला होता. कारण ते कुत्रे रडता-रडता अचानकच गुरगुरायला लागली होती. आताही ते कुत्रे त्या ठराविक जागेकडे बघूनच गुरगुरत होती. समीर घाबरलेला असला तरी ही नक्की काय भानगड आहे, आणि हे सर्व कुत्रे त्या एका जागेकडे बघूनच का गुरगुरत आहेत हे जाणून घ्यायचं ठरवतो. मग घाबरत घाबरतंच तो त्या बाकड्यावरून उठतो..बॅग तशीच बाकड्यावर ठेवून तो पाऊलं त्या कुत्र्यांच्या दिशेने वळवतो…त्याच्या पडणा-या प्रत्येक पाऊलागणिक ते कुत्रे त्या जागेकडे बघून अजूनंच जोर-जोरात रडायला लागतात..तो रडण्याचा आवाज ऐकून मग मात्र समीर जागच्या जागीच थांबतो. भितीने तर आता त्याला काही सुधरतंच नव्हतं..हृदयाचे ठोके तर आता सेकंदाला वाढत जात होते. पुढे जावू की नको हा साधा निर्णय घेण्याइतपतसुद्धा त्याच्यात भान ऊरलं नव्हतं..आणि अश्या वेळीच माणूस चुकीचा निर्णय घेवून एक मोठी चूक करतो..!! समीरनेही तेच केलं. तो त्या जागेच्या दिशेने जायचं ठरवतो..आणि मग पुन्हा त्याची पाऊलं त्या जागेच्या दिशेने पडू लागतात..त्याच्या पडणाया प्रत्येक पाऊलांचा आवाज त्या भयाण शांततेत खुपच घाबरवणारा वाटत होता. चेह-यावरचा घाम पुसत समीर आता कानोसा घेत त्या जागेच्या दिशेने चालत होता..कुत्रेसुद्धा आता अचानकंच रडणं बंद करतात.  त्या कुत्र्यांच्या विक्षिप्त वागण्याने समीर त्याची नजर त्या जागेवरून हटवून कुत्र्यांच्यावर वळवतो. तेव्हा मग त्याला त्या कुत्र्यांचे हावभाव बदलताना दिसतात..ते कुत्रे रडणं आणि गुरगुरणं थांबवून, घाबरत शेपूट दुमडून दबक्या चालीने मागे सरकत होते..दबक्या चालीने मागे सरकत असताना अचानक कोणी दगड मारावा तसं ते क्यावऽऽ क्यावऽऽ करत ओरडत पळत सुटतात आणि काही क्षणातंच नजरेआड होतात…

(क्रमशः)

लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh


DMCA.com Protection Status

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part )

समीर आता तिच्या Rpy ची वाट पहात होता. रात्रीचे दोन वाजत आले होते, तिला मॅसेज पाठवूनही आता बराच वेळ झाला होता. पण, अजूनही तिचा Rpy आला नव्हता. तिने कदाचित चूकूनंच मला मॅसेज पाठवला असेल असं स्वतःच्या मनाशी पक्क करून समीर हातातील मोबाईल खिश्यात ठेवायला लागतो. पण, तेवढ्यात मोबाईलची msg tone वाजते. ती tone ऐकल्याबरोबर समीरच्या चेह-यावर शंकेची लकेर उमटते.  तो तसाच गडबडीत मॅसेज open करून वाचायला लागतो. मॅसेज वाचून समीरला थोडा धक्का बसतो. त्या मॅसेजमध्ये असं लिहिलेलं होतं, ” मी चुकीच्या नंबरवर कधीच मॅसेज करत नाही. मी तुला ओळखते..तु समीर..!! हो ना..?? ”

ही मला कशी काय ओळखते..?? नक्की ही आहे तरी कोण..?? समीर एकामागोमाग एक असे अनेक प्रश्न स्वतःलाच विचारायला लागतो. पण कितीही विचार केला तरी त्याला  उत्तर काही सापडत नव्हतं..!! तिला Rpy करू की नको ह्या विचारात समीर बस स्टाॅपवर  येरझ-या मारायला लागतो. बराच वेळ विचार केल्यावर समीर तिला Rpy द्यायचं ठरवतो. तो पुन्हा एकदा मॅसेज Type करायला लागतो. ” हे बघ सावित्री..आता खुप झालं. तु नक्की कोण आहेस हे मला खरं सांग. खरं सांगायचं असेल तरंच Rpy दे..” हे सारं Type करून तो मॅसेज send करतो. Send केल्याबरोबर तिला लगेचंच मॅसेज पोहोचतो, ते ही पुन्हा एकदा नेटवर्क नसताना..!!

मॅसेज send  केल्यावर समीरची बैचेनी प्रत्येक सेकंदाला वाढत जाते. तो प्रत्येक सेकंद त्याला एका तासाऐवढा वाटायला लागतो. काही केल्या ती वेळ लवकर जात नव्हती..!! म्हणून तो पुन्हा-पुन्हा मोबाईल check करून तिचा मॅसेज आला की नाही हे बघायला लागतो. बस स्टाॅपवर चकरा मारून-मारून आता त्याचे पायदेखील दुखायला लागतात. पायांना जरा आराम मिळावा म्हणून तो परत बाकड्यावर येवून बसतो. पण, तो बाकड्यावर येवून बसणारंच होता की तितक्यातच मोबाईलची रिंग वाजते. रिंग वाजल्यावर समीर मोबाईल बघायला लागतो. तेव्हा मोबाईलच्या screen वर त्याला Battery Low असं दिसतं आणि लगेचच त्याच्या दुस-याच सेकंदाला मोबाईल switch off देखील होतो..!!  समीर आता वैतागून कपाळाला हात लावून बसतो. एवढ्या सुमसाम वाटेवर त्याला आसपास कोणीच नसताना फक्त त्या मोबेईलचाच आधार होता. म्हणून, तो हतबल होवून स्वतःच्याच नशीबाला दोष देत मग त्या बाकड्यावर तसाच उदास बसून रहातो.

मोबाईल switch off झाला, त्यामुळे आता सावित्रीचा  मॅसेज येणार नाही. ती नक्की कोण होती हे आता कितीही प्रयत्न केला तरी कळणार नाही. ह्या विचाराने आता समीरसुद्धा बैचेन व्हायला लागतो. त्या बैचेनीतंच तो बंद झालेल्या मोबाईलला हातात घेवून सारखा बघत रहातो. बराच वेळ त्याचं असं बघणं चालू असतं. थोड्या वेळाने बंद पडलेल्या मोबाईल screen वर समीर स्वतःचा प्रवासाने आणि ईथल्या अनपेक्षीतपणे आलेल्या परिस्थिने थकून गेलेला चेहरा बघायला लागतो.
मोबाईल बघता-बघता मग अचानकंच मोबाईल screen वर त्याच्या चेह-याऐवजी केसांनी पूर्णपणे झाकून गेलेला चेहरा दिसतो..!! आणि मग दुस-याच क्षणी सावित्रीचा call येतो. तो चेहरा बघून आणि मोबाईल switch off असतानाही सावित्रीचा आलेला call बघून, आता नं घाबरणारा समीरसुद्धा थर-थर कापायला लागतो. पूर्णपणे घाबरून गेलेला समीर तिचा call घेत नाही. खरं तर तो call घेण्याची तशी त्याची हिम्मतंच होत नाही. शेवटी रिंग वाजून-वाजून मोबाईल पुन्हा बंद पडतो..!! ह्या अनपेक्षित आणि विचित्र घटनेमुळे समीर पार हादरून गेला होता. भितीमुळे आधारासाठी आजूबाजूला कोणी दिसतय का हे बघण्यासाठी त्याची नजर भराभर फिरू लागते. पण, दूरपर्यंत कोणी ऐण्याचं कसलंच चिन्ह दिसत नव्हतं. भितीपोटी आता त्याच्या घश्याला कोरड पडली होती. बॅगेची चैन घाई-घाईतंच उघडत तो बाॅटल काढतो. बाॅटल काढून गटागट पाणी पितो. ऐवढ्या थंडीतही घामाघूम झालेला चेहरा खिश्यातील रूमालाने पुसतो. स्वतःला सावरत, खोटा धीर देत शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण, दुदैवाने आज त्याच्या नशिबात वेगळंच काहीतरी मांडून ठेवलेलं होतं. कारण, काही वेळ तसाच शांततेत गेल्यानंतर पुन्हा मोबाईलची रिंग वाजायला लागते..!! आता समीर आणखीनच थर-थर कापायला लागतो. कशीतरी हिम्मत एकटवून तो मोबाईल बघतो. मोबाईलच्या screen वर आता त्याला एक पूर्ण जळालेला चेहरा विचित्र हसताना दिसतो. तो भयाणक चेहरा बघितल्यामुळे घाबरून गेलेल्या समीरच्या हातातून मोबाईल खाली पडतो..!!!

( क्रमशः )

लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh



DMCA.com Protection Status

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part )



” चला, चला..उतरा लवकर..पंधारवाडी आली..” कंडक्टर मोठ-मोठ्या आवाजात बोलत असतो. नुकताच डोळा लागलेला समीर कंडक्टरच्या आवाजाने गडबडून जागा होतो. डोळे चोळत कंडक्टरकडे बघत बोलतो, ” मामा, पंधारवाडी आहे का ही..?? कंडक्टर, ” कव्हापासून घसा ताणून ओरडतोय, झोपला व्हतास काय..?? व्हय, पंधारवाडीच हाय ही..उतर पटकन, एसटी सुटल आता..”
“हा-हा..” घाई-घाईतंच बॅग खांद्याला अडकवत समीर बोलतो. एसटीमधून उतरत असताना दरवाज्याच्या बाजूच्याच सीटवर बसलेला एक म्हातारा माणूस समीरला गूढ आवाजात बोलतो, ” पोरा..जरा जपून -हा. ही येळ चांगली न्हाय ..” समीर त्या म्हाता-याकडे जरा आश्चर्याने बघतंच एसटीमधून उतरतो. फक्तं समीर सोडला तर त्या स्टाॅपवर तेव्हा एकही प्रवासी उतरला नव्हता. समीर उतरल्या बरोबरंच एसटी तिथून निघून जाते. आता रात्रीचे जवळ-जवळ साडेबारा वाजले होते. एसटीला पंधारवाडीला पोहोचायला तब्बल सहा तास ऊशीर झाला होता. त्यामुळे तिथे समीरशिवाय एक चिटपाखरूसुद्धा नव्हतं. आजू-बाजूला तर नुसता अंधारंच पसरलेला होता. रात किड्यांच्या आवाजाव्यतिरिक्त त्यावेळे कसलाच आवाज तिथे शांतता भंग करण्यासाठी नव्हता. कुणी माणूस दिसतय का हे बघण्यासाठी समीर तिथून थोडासा पुढे चालायला लागतो. पण, दूरपर्यंत नजर टाकली तरी त्याला तिथे अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं. शेवटी, रात्रं तो एसटी स्टँडवरंच काढायचं ठरवतो. ते एसटी स्टँडसुद्धा नावालाच होतं. एक सिमेंटचा तुटलेला बाकडा आणि त्याच्या बाजूलाच थोडा वाकलेला लाईटीचा खांब, एवढीच काय ती एसटी स्टँड म्हणून केलेली सोय..!! समीर खांद्यावरची बॅग काढत त्या बाकड्यावर येवून बसतो. खिशातून मोबाईल काढून तो नेटवर्क आहे का पहायला लागतो. पण, गाव थोडं आड वाटेला असल्यामुळे मोबाईला रेंज नव्हती. मित्राच्या लग्नासाठी त्याच्या गावी आलेला समीर आजची रात्रं नाईलाजाने का होईना पण, एसटी स्टँडवर एकट्यानेच काढणार होता, निदान असं त्याला तरी वाटत होतं..!!

बराच वेळ झाला होता समीर स्टँडवर बसून. आता रात्रीचे दिड वाजून गेले होते. समीर त्याच्या हातातल्या मोबाईलमध्ये जुने  whatsapp वरचे मॅसेजेस वाचण्यात गुंग झालेला होता. मोबाईलला अजूनही नेटवर्क मिळाला नव्हता. त्यामुळे कोणाचाच फोन आणि मॅसेज त्याला आला नव्हता आणि ना त्यालाही करता येत होता. जुने मॅसेज वाचता-वाजता अचानक त्याला whatsapp वर Unknown no. वरून एक मॅसेज येतो. नेटवर्क नसतानाही समीरला तो मॅसेज आलेला असतो. त्यामुळे त्याला थोडं आश्चर्य वाटतं. नक्की काय मॅसेज आहे हे पाहण्यासाठी समीर मॅसेज open करतो. त्या Unknown no. वरचा मॅसेज असा असतो, ” Hi, मी सावित्री. ओळखलंस का मला..?? ” हा मॅसेज वाचून समीरला धक्काट बसतो. त्याला तसं कारणही होतं. एकतर नेटवर्क नसताना समीरला मॅसेज आलेला असतो, तोसुद्धा एवढ्या रात्री आणि तेसुद्धा एका मुलीचा मॅसेज. ती मुलगीसुद्धा समीरसाठी अनोळखीच होती. कारण, समीर सावित्री नावाच्या एकाही मुलीला ओळखत नव्हता. एकामागोमाग पडलेल्या प्रश्नाने समीर थोडा हैराण होतो. मनाने खंबीर असल्यामुळे समीरला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं पण, भिती नव्हती वाटत..!!

मोबाईलला नेटवर्क नव्हता त्यामुळे, तिला रिप्लाय कसा करायचा हे त्याला कळत नव्हतं. पण, तिचाही मॅसेज कुठलाही नेटवर्क नसताना आला होता मग, आपणही बघूया Try करून जातोय का मॅसेज, असा विचार समीरच्या डोक्यात तेव्हा घोळत होता. शेवटी विचार करून तो मॅसेज Type करायला लागतो. ” Hello, सावित्री. पण, sorry..मी तुला ओळखत नाही. मला वाटतय कदाचित तु चुकीच्या नंबरवर मॅसेज केला आहेस.” असा मॅसेज Type करून समीर तिला तो send करतो. त्याचाही मॅसेज नेटवर्कची एक कांडीसुद्धा शिल्लक नसताना तिला पोहोचतो..!!

 (क्रमशः)

लेखक : सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh


DMCA.com Protection Status