Saturday, November 4, 2017

ओढ... ( कविता )

भेटायची ओढ होती
तरी भेटण्याची वेळ नव्हती
बोलावसं वाटलं तरी
बोलण्याची वेळ नव्हती
सांगावसं वाटत होतं
तरी सांगण्याची वेळ नव्हती
ती वेळंच जणू अशी
माझ्यावर रूसली होती...

ती समोर होती, मी समोर होतो
नजरेला नजरसुद्धा भिडत होती
हलकेच नजर चोरून मी
मग नजर तिची चुकवत होतो
बदललो नव्हतो मी नक्कीच
तरी बदलल्यागत वागत होतो
जाणून-बूजून मी तेव्हा
माझ्या मनाशीच खेळत होतो...

संपलं नव्हतं नातं तरी
का संपल्यागत ते भासत होतं..??
अस्तित्त्व तिचं असूनसुद्धा
नाकारावसं वाटत होतं
नजरेसमोर होतं सगळं
तरी नजरेआड सारं गेलं होतं
शोधून-शोधून थकण्यापेक्षा
आता विसरण्यातंच सारं भलं होतं...


कवी : सतीश रमेश कांबळे.

DMCA.com Protection Status

Tuesday, October 3, 2017

रात्री-अपरात्री..

माझा पूर्ण परिवार दोन दिवसांपूर्वीच गावी जत्रेसाठी गेला होता. त्यामुळे मला सोबत म्हणून विशाल माझ्या घरी गेल्या दोन दिवसांपासून झोपायला येत होता. आजही तो आला होता. घरी कोणी ओरडायला नसल्यामुळे, रात्रीचं जेवण आवरल्यावर मी आणि विशाल हायवेजवळ असलेल्या टपरीवर सिगरेटसोबतंच गरमागरम वाफाळलेल्या चहाचा घोट घेण्यासाठी माझ्या बाईकवरून निघालो. आमच्या घरापासून हायवे साधारण सहा किलोमीटर लांब. खरंतर चहा वगैरे बहाणाच.. हा थंडीचा मोसम.. त्यामुळे बाईकवरून असं  रात्रीचं सुसाट जाण्याची मज्जाच काही वेगळी असते.. बाईकच्या वाढणा-या स्पीडसोबतंच सुईरारखी बोचणारी थंडी अंगावर मस्तीचे शहारे आणण्यासाठी पुरेसे असतात..!! त्यात विशालसारखा अतरंगी मित्र सोबत, मग काय धम्मालंच की...!!!

बाईक डांब-या रस्त्यांवरून सुसाट चालली होती.. रात्र असल्यामुळे रस्त्यांवर दिवसा असते तशी गाड्यांची वर्दळ नव्हती.. त्यामुळे बेशूट गाडी पळवण्याचा मला परवानाच मिळाला होता.. पण, ते कोण्या शहाण्याने म्हंटलंच आहे ना की, "जोश में होंश मत खो ना.."  अहो आमचंही तसंच काहीतरी झालं तेव्हा. म्हणजे, सुसाट गाडी पळवण्याच्या जोशमध्ये आम्ही चहाच्या टपरीपासून एक दिड किलोमीटर थोडं जास्तंच पुढे आलो. मग गाडी तशीच कडेकडेनी "राँग वे" ने टाकत टपरीजवळ आणली. बाईक तिथेच आडोश्याला लावली आणि तडक हात सिगरेटच्या पॅकेटावर टाकले.. विशालच्या हाताचा पंजा आदीमानवासारखा फताडा असल्यामुळे ती खजिन्याची पेटी पहिली त्याच्याच हाताला लागली. शहाण्याने स्वतःसाठी एक सिगरेट काढली आणि पॅकेट माझ्याकडे वळवलं. मी ही एक सिगरेट काढून पॅकेट सरळ आत टपरीत भिरकावून दिलं.. टपरी पत्र्याच्या भिंतीने झाकली असल्यामुळे ते नाजूकसं पॅकेटसुद्धा पत्र्यावर आपटाचक्षणी विजेच्या कडकडांसारखा जोरदार आवाज झाला. मग त्यावर टपरीतल्या काका काकूंनी कवट्यामहाकाल सारखा खतरनाक लूक मला दिला. मीसुद्धा बघून नं बघितल्यागत केलं आणि गप्पं विशालजवळ जावून उभा राहिलो. तोपर्यंत काकूंनी चहाचा टोप गॅसवर चढवला.. थोड्याच वेळात चहाचा कडक सुगंध आमच्या नाकपुड्यांत घुसायला लागला.. सिगरेटसुद्धा संपल्यातंच जमा होती. म्हणून, शेवटचा श्वास घेत असलेल्या सिगरेटची धडपड मी एका दममध्येच थांबवून टाकली आणि मग तिचं उरलेलं अवशेष पायाखाली चिरडत पायानीच मातीत गाडून टाकलं..!! थंडी असल्यामुळे साहजिकंच लघवीलासुद्धा अधूनमधून जावं लागत होतं. काकू कळकटलेल्या पेल्यामध्ये वाफाळलेला चहा ओतायच्या आधीच मी तिथून थोडं पुढे रस्त्याच्या कडेला, वृक्षदिनाच्या निमित्ताने लावलेल्या रोपांचा आडोसा घेत हलका होवू लागलो. आजूबाजूला नजर टाकली तर नुसता काळोखंच काळोख.. आता विशालचा काळा चेहरा बघण्याची सवय झाली असल्यामुळे ह्या काळोखाची फारशी भिती वाटली नाही म्हणा. पण तरीही मी घाबरलो नाही हे माझं मलाच पटण्यासाठी गाणी गुनगुनू लागलो. आता माझ्या गाण्याचा प्रभाव म्हणा किंवा माझ्या सुरेल आवाजाचा प्रभाव म्हणा हवं तर..पण, ते ऐकून अचानक चक्क एक म्हातारी बाई माझ्यासमोर हाकेच्या अंतरावर प्रगट झाली. तिला बघून पटापट आवरतं घेत पटकन पँटची झीप लावली आणि गांगरलेली नजर तिच्याकडे टाकत एक जबरदस्तीची स्माईलंही दिली.. अबबबं..पहातोय तर काय, तर ती म्हातारीही शेवटचा उरलेला दात दाखवत ओठ पसरून चक्कं हसली.. च्याआयला, ऐवढा खर्च करून पण एक मुलगी पटत नाही ईथे आणि आता नं पटवताच ही म्हातारी फुकटची लाईन देतेय राव.. ह्यावर हसू की रडू हे समजत नव्हतं आणि तिला विचारण्याचं धाडस काय माझ्यात तरी नव्हतं बुवा.. त्यात तिथून विशाल "महिन्याभराचा कोटा आजंच पूर्ण करतोयस का.?? साल्या, चहा थंडं होतोय लवकर ये" हे घसा ताणून बोंबलत होता. आता त्याला काय सांगू ह्या म्हातारीला बघून मी कसा थंडं पडलोय ते..!! मला तर वाटतंय ही म्हातारी वेडी असणार.. बघा ना केव्हापासून नुसती वेड्यागत हसतेय. बापरे, कदाचित माझ्या मनातलं तिनं ऐकलं.. कारण, हसणं थांबवून ती आता माझ्या दिशेने एक हात मोडकळीस पडलेल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवून दुसरा पाय बहुतेक वाटी नसल्यामुळे फरफटत आणत होती. तिला बघून खरंतर मला जोरात किंकाळी फोडायची होती.. पण, का कोणास ठाऊक अशावेळी घशातून आवाज का निघत नाही..?? की, आवाजाचीही टरकते अश्यावेळी बाहेर पडायला..!!  जे काय असेना ती म्हातारी आता बघता-बघता माझ्या पुढ्यातंच येवून उभी राहिली. माझ्या भेदरलेल्या डोळ्यांत डोळे घालून ती तिचा एक उरलेला दात दाखवत कसल्याश्यातरी नजरेने बघायला लागली. थोड्या वेळासाठी मला वाटलं, आता ही जादूची झप्पी देतेय की काय..!! पण, नशीब..तिने तसं काही केलं नाही.. कदाचित "मुन्नाभाई एम.बी.बी.एस." बघितला नसेल तिने..!! 

अंगावर लालभडक नववारी साडी, हातात हिरव्या पिवळ्या बांगड्या, थकलेला पण तश्यातंही उठून दिसणारा चाबरट चेहरा, पाठीत वाकलेला कणा, डाव्या हाताने छातीशी धरून ठेवलेलं एक छोटसं गाठोडं आणि एका बाजूने चिमटलेलं डोकं.. ह्यापलीकडे आजीबाईंचं वर्णन करण्यासारखं काही नव्हतंच. हाताची बोटं तर चाकूसारखी दिसत होती. त्यामुळेच बहुतेक तिच्या हाताला चित्रविचित्रं जखमा झाल्या होत्या..!! ती तिची चाकूसारखी दिसणारी बोटं हळूहळू माझ्या चेह-यावरून फिरवू लागली..ओठांतल्या ओठांत काहीतरी पुटपुटायला लागली. आईशप्पथ सांगतो, मला तर तात्या विंचूच डोळ्यांपुढे दिसू लागला.. ओम फट स्वाहा..हा.! पण दुदैवं बघा.. ईथे लक्ष्याला वाचवायला ईनस्पेक्टर महेश जाधव जवळ नव्हता.. तो तर लक्ष्याच्या म्हणजे माझ्या वाटणीच्या चहाचा घोट मारण्यात दंग होता.. व्वा रे तेरी दोस्ती..!!

ती आजीबाई तर आता फुल फाॅर्ममध्येच आली होती की. तिने तोंडाचा जबडा अजगरासारखा उघडला.. आतून सापागत टोकाला विभागलेली जीभ भसकन बाहेर काढली. हो पण, भसकन काढण्याच्या नादात तिचा शेवटचा दातंही उखडून जमिनीवर टपकन पडला..!! आता काय.. हि बया तर आणखीनंच भयानक दिसायला लागली.. जीभ तर काय, ईथून तिथून नुसती थयथय नाचत होती.. डोळे तर वाटत होते की, आता कोणत्याही क्षणाला माझ्या थरथरत्या हाताच्या ओंजळीत येवून पडतील. काही वेळापूर्वी ओढलेल्या सिगरेटचा धूर आता ध्यानीमनी नसताना नको तिथून बाहेर पडत होता.. नुसता धूरंच धूररर.. धुराच्या वासाने म्हातारी आणखीनंच चेताळली. उभ्या जागेवरंच गरागरा फिरू लागली. डोळ्यांच्या बाहुल्या बेताल नाचवू लागली. मग, डोक्याला झटका देत केसांचा विरळ झालेला बुचडा झपकन चेह-यावर  सोडला. त्या केसांच्याआड दिसणारा तिचा चाबरट चेहरा बघून मला भुलभुलय्यामधली मोंजोलीका आठवली नसती तर नवलंच..!! तेव्हा मग अक्षय कुमारला स्मरून होती नव्हती तेवढी सर्व हिंम्मत एकटवून तिला घाबरतंच विचारलं,
- "ओ आजी, बस करा की. पोराचा जीव घेताय का आता.? किती नखरे कराल ह्या वयात. घाबरलं की पोरगं..!!"

पण, आजी काय हू नाय की चू नाय. थोड्या वेळासाठी वाटलं की ही वेडीच नाही तर बहिरी आणि मुकी पण आहे. म्हणून म्हंटलं बघू साईड लँग्वेजमध्ये बोलून काय होतय काय. पण कसलं काय.. म्हातारी तर भलतीच शहाणी निघाली की राव. साणकन कानशीलात लावली माझ्या..
- ये भाड्या, तुला काय तसली बया वाटली व्हय रं.. नसत्या
खाणाखुना कशाला करतंय..??

देऽऽऽवा.. हेच बाकी राहिलं होतं आयुष्यात बघायचं तेवढं.  रात्री अपरात्री एका म्हातारीच्या हातून असा मार खावा लागण्यासारखं मोठं दु:खं काय असावं बरं. तरी बरं, कोणी बघितलं नव्हतं हानताना. नाहीतर लाज गेली असती चार चौघांत.. म्हातारीने सनकवलेला गाल तसाच चोळत विशालच्या वाटेवर नजर लावून बघत असताना म्हातारी पटकन पचकली,
- म्या तुझ्याकडं मदत मागाया आलीया.. माझं घर ईथून लय लांब त्या तिथं वडेगावास्नी.. मला माझ्या घरी जायचंया..पर पदराशी एक दमडी पण नाय रं पोरा.. मला पैकं दे, लय ऊपकार व्हतील पोरा..

म्हातारी फारंच अगतीक होवून बोलली राव. मला काय रहावलं नाही. तसा लहानपणापासूनंच मी खुप हळवा. त्यामुळे हिला मदत करावी असं मनापासून वाटलं. खिश्यात चार-पाचशे रूपये होते ते सर्व तिला देण्यासाठी हात खिशात टाकला. म्हातारीला पैसे द्यायला मी हात पुढे केला खरा पण, तेवढ्यात विशालची हाक ऐकू आली. त्यासरशी मी दचकून हात तसाच आवरता घेतला. विशाल पाच-सहा पावलं दूर अंतरावरून बोंबलला,
- अरे ये येड्या.. एकटा काय बडबडतोयस.? आणि पैशे कोणाला देतोयस.?? सिगरेट चढली की काय तुला.?

विशाल असा काय बोलतोय हे मला समजत नव्हतं. साक्षात माझ्या पुढ्यात उभी असलेली म्हातारी ह्याला दिसली नाही काय..?? येडा कुठचा.. ऐवढे भदाडे टपोरे डोळे देवाने देवूनंही साला ह्याची बत्ती गुलंच. अरेरेरेरे.. काय दुदैवं म्हणावं ह्याला. बघा आजीबाई कसा येडछाप मित्रं आहे माझा. बघा जरा..बघा. असं बोलून मी म्हातारीच्या दिशेने वळलो. पण, कसलं काय.. बघायला म्हातारी तिथे होतीच कुठे.! ती तर केव्हाच मिस्टर इंडियावाणी गायब झाली होती माझ्या पैश्यांसकट. मग, रिकामा हात डोळ्यासमोर धरत मी पार रडकुंडीला येवून बोललो,
- विशाल भावाऽऽ, त्या म्हातारीने तर मला पार लुटला यार.. बघ, कसं ठणठण गोपाळ करून टाकलं मला.
- अबे, कोणत्या म्हातारीबद्दल बोलतोयस.? विशाल चेह-यावर आट्या पाडत बोलला.
- अरे तीच म्हातारी जिच्याशी मी आता बोलत होतो.
- ये बाबा, येडाबिडा झालास काय. केव्हापासून तुला एकट्यानेच बडबडताना बघतोय. कसली म्हातारी नी कसलं काय.! चल निघूया आता.
विशाल डोक्याला टपली मारत बडबडला. थोड्या वेळासाठी मी सुन्नं. सुचतंच नव्हतं काय. ती म्हातारी भूत बित तर नव्हती ना.? डोक्यात खुप सारे प्रश्न आणि मनात टरकवणारी भिती. खुपंच डेडली काँबिनेशन.! तेव्हा खांद्यावर विशालची थाप पडली. मागे रस्त्याच्या दिशेने बोट दाखवत,
- सत्या, तुला दिसलेली म्हातारी, तीच का.? 
मी पटकन मान रस्त्यावर वळवली. तर बघतोय काय, तर हि तीच म्हातारी..!! च्याआयला, पण ही ईथे आलीच कशी..?? आणि रस्त्याच्या मधोमध उभी राहून नक्की करतेय तरी काय..?? मी मनातल्या मनात माझ्यापरीने अंदाज बांधायला लागलो. पण, तेवढ्यात विशाल जोरात बोंबलला. ओऽऽ आजीऽऽ.. व्हा की साईडला. जीव जास्तं झालाय काय तुम्हाला..?? जायचा ना एखादा गाडीवाला वर घेवून.. काय आश्चर्य बघा.. विशालची काळी जबानची जादू चालली आणि त्याचं बोंबलनं संपायच्या आतंच आमच्या डोळ्यांदेखत एक भरधाव ट्रक म्हातारीला चिरडत निघून गेला.! जाता जाता त्या ट्रकने काका-काकूंच्या टपरीलासुद्धा जोरदार धडक दिली. त्या धडकेचा आवाज मला धडकी भरण्यासाठी पुरेसा होता. मग स्वतःला कसंबसं सावरत विशाल आधी म्हातारीजवळ धावला..आणि मी भितीने घश्यात अडकलेला आवाज बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तसाच उभा राहिलो. विशाल म्हातारीजवळ पोहोचला खरा. पण, म्हातारीने परत एकदा चकमा दिला ना राव. ना तिथे म्हातारी होती ना तिच्या रक्ताच्या खुणा..!! आता टरकायची वेळ विशालची होती. ऐवढा जनावरासारखा दिसणा-या माझ्या सालस मित्राची बोबडीच वळली की भितीने. मग तसाच किंचाळत तो धावत माझ्याजवळ आला. त्याच्या किंचाळण्याच्या आवाजाने केव्हाचा घश्यात अडकलेला माझा आवाजही बाहेर पडला. मग आमचा मोर्चा तडक काका-काकूंकडे वळला. वायुवेगाने आम्ही अपघातग्रस्त टपरीजवळ धावलो. पण.... आता तर हद्दच झाली होती. ईथे ट्रकने फूटबाॅलसारखी उडवलेली टपरीसुद्धा जागेवर नव्हती. काका-काकूही दिसत नव्हते कुठेच. हे नक्की काय चाललंय काहीच कळत नव्हतं. त्या ट्रकने टपरीचा चुराडा करताना आम्ही दोघांनीही नीट पाहिलं होतं. मग टपरी गुडुप कशी काय झाली..?? देऽऽऽवा..तुच वाचव आम्हाला आता. ही भूताटकीच आहे विशाल. चल पटकन कलटी मारू ईथून. मी वाढलेल्या हृदयाच्या ठोक्याला आवर घालत बोललो. तसे आम्ही दोघेही बाईकच्या दिशेने पळालो. धापा टाकतंच आम्ही बाईकजवळ पोहोचलो. चावी काढण्यासाठी खिशात हात खुपसला. पण, चावी खिशात नव्हतीच. कदाचित पळण्याच्या गडबडीमध्ये चावी टपरीजवळंच कुठेतरी पडली असणार. त्यामुळे मी ती घेण्यासाठी परत माघारी फिरलो. विशालंही माझ्यासोबत आला. हो पण मला मदत करायला नाही तर टरकल्यामुळे त्याला एकट्याला उभं रहावत नव्हतं म्हणून.! तसं तो सोबत आला ते बरंच होतं म्हणा. कारण मला एकट्याला तरी चावी आणायची कुठे हिंम्मत झाली असती.! मी मोबाईलचा टाॅर्च ऑन करून चावी शोधायला लागलो. खुप अंधार असल्यामुळे चावी भेटेल की नाही हा मोठा प्रश्नच होता आमच्या पुढ्यात. तेव्हा " हि घे तुझी चावी पोरा.." -काहिसा घोगरा वाटणारा ओळखीचा आवाज मागच्या बाजूनी अचानक कानावर येवून धडकला. मी मागे वळलो. पहातोय तर काय. हातात चावी घेवून तीच म्हातारी उभी होती.! हो तिच म्हातारी.! जिला थोड्यावेळापूर्वीच ट्रकने चिरडलं होतं. माझ्या तर डोक्याचा पार भुगा झाला होता. नको तसले विचार डोक्यात थैमान घातल्यानंतरच्या दुस-याच मिनिटाला मी बेशुद्धं पडलो. सकाळी जाग आली ती तोंडावर पडलेल्या गरमागरम पाण्याच्या धारेने. तोंडावरून ओघळणारं पाणी पुसण्यासाठी तळहात तोंडाजवळ धरले. पण, घपकन एक उग्र वास नाकाची भगदाडे पार करत पार आतपर्यंत घुसला. हे नक्की कोणाचं काम हे बघण्यासाठी नजर वळवली. तेव्हा बाजूलाच एक हडकुळं कुत्रं जेमतेम शाबूत असलेली शेपूट मोरावाणी डोलवत उभा होता.! जे काय समजायचं होतं ते समजून घेत मी मग तिथेच पडलेला एक दगड उचलला आणि त्याच्या दिशेने दानकन भिरकावून दिला. साला पण माझ्या नेमचा काही नेमंच नाही ना राव. बघा ना, कुत्र्याला मारलेला दगड त्याला नं लागता तिथेच पुढे आडवा पडलेल्या विशालच्या पेकाट्यावर जावून लागला.! त्यामुळे कुत्र्याच्या क्याॅवऽऽ क्याॅवच्या ऐवजी विशालच्या शिव्या ऐकू येवू लागल्या. चला, म्हणजे अख्खी रात्रं खराब गेली पण सकाळची सुरूवात मात्रं कुत्र्याच्या मुताने आणि विशालच्या शिव्याने चांगली झाली होती.!

कपड्यांना चिकटलेली माती झाडत मी आणि विशाल ढांग टाकून सरळ बाईकवर जावून बसलो. ज्या स्पीडने आम्ही काल रात्री इथे आलो होतो त्याच स्पीडने आज इथून निघूनंही गेलो. आधी विशालला त्याच्या घरी सोडलं आणि मग मी माझ्या घरी आलो. तोपर्यंत डोकं पार भनभनून गेलं होतं. रात्रं रस्त्यावरंच काढल्यामुळे अंगसुद्धा जड झालं होतं. त्यामुळे आल्याबरोबर स्वतःला बेडवर झोकून दिलं. डोळे गच्चं मिटले. पण, तरीही झोप काही लागत नव्हती. मग अचानक टिमटती लाईट भक्कन पेटावी तसं माझ्या डोक्यात काहीतरी झालं त्यावेळेस. काही तरी अंधूक असं मला आठवलं. मी तडक बेडवरून उठलो आणि टेबलावर ठेवलेल्या पेपरच्या गठ्ठयामधून एक आठवड्यापूर्वीचा पेपर काढला. पेपर नीट चाळल्यावर आतल्या पानावर तीन जणांची फोटोनीशी एक बातमी दिसली. तिघांचाही फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होता. स्पष्ट काही दिसत नव्हतं. पण, नीट लक्ष देवून बघितल्यावर मला खात्री पटली की, हे फोटो तर ती म्हातारी आणि त्या काका-काकूंचेच होते.! त्या बातमीचा मथळा असा होता- "काल रात्री घडलेल्या भिषण अपघातामध्ये वुद्ध महिलेव्यितिरिक्त एका दांपत्याचा करूण अंत.." हा मथळा वाचताना भितीने अंगावर काटा येत होता. ओठ थरथरत होते. पण, तरीही पूर्ण बातमी वाचण्याचा मोह मला आवरला नाही. ओठांतल्या ओठांत पुटपुटत मी बातमी वाचायला लागलो. "एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकने तीन जणांना चिरडलं. त्यात त्या तिघांचाही जागेवरंच मृत्यु झाला. अपघातामध्ये एक वृद्ध महिला सौ. लक्ष्मीबाई जरांडे (६७) रा. वडेगाव, श्री. प्रमोद भिसे (४२) आणि सौ. कांता भिसे (३७) रा. कोनगाव, ह्यांचा दुदैवी मृत्यु झाला. अपघातामधील दोषी वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्यातरी वाहनचालक फरार असून स्थानिक पोलिस दल त्याचा कसून शोध घेत आहेत." बातमी वाचली आणि हातातला पेपर हातातून कधी गळून पडला हे हातालाही समजलं नाही...!!!


(समाप्त)

लेखक- सतीश रमेश कांबळे.


DMCA.com Protection Status

Saturday, September 9, 2017

असाच एक किस्सा #1

माझ्या मित्राला काही महिन्यांपूर्वी आलेला एक मजेदार अनुभव. अनुभव जरी मजेदार असला तरी त्यामधून एक बोचणारा पण तेवढाच मौलिक संदेश नक्कीच मिळतो. आता तो घेणं नं घेणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

तर.. कामावरून घरी परतत असताना माझ्या मित्राला, तो प्रवास करत असलेल्या रेल्वेच्या डब्ब्यातून जोरदार भांडणाचा आवाज ऐकू आला. नजर देवून पाहिलं तर त्याला दोन तिशीतले तरूण दात-ओठ खात भांडताना दिसले. कदाचित रेल्वेमध्ये चढताना एकाचा चुकून धक्का लागला होता दुस-याला. त्यावरूनंच काय ती त्या दोघांच्यात खडाजंगी सुरू झाली होती. दोघेही हिंदी भाषिक वाटत होते. निदान त्यांच्या हिंदीत चाललेल्या भांडणावरून तरी तसंच वाटत होतं. दोघं भांडणात एकमेकांचा अगदी यथेच्छ उध्दार करत होते.! हा त्याची आई काढतोय, तो त्याचा बाप काढतोय.. कोणीच माघार घ्यायला तय्यार नव्हतं. डब्ब्यातले बाकीचे प्रवासीसुद्धा दिवसभराचा थकवा विसरून त्यांची चाललेली शब्दांची धुमचक्री बघण्यात पार गुंग झाले होते. शेवटी काय तर, दुस-यांचं भांडण म्हणजे आपलं मनोरंजन ही वुत्तीच झाली आहे सर्वांची. असो, तर त्यांचं भांडण क्षणाचीही उसंत नं खाता साधारण असंच पाच दहा मिनिटं सुरू होतं. शेवटी त्यातल्या एकाने आपल्या खिजगणीतून एक शेवटचं पण तितकंच सशक्त हत्यार(मुद्दा) काढलं "भूमीपुत्राचं".. तसं तर हे हत्यार प्रत्येकजणंच स्वतःच्या बचावापुरतं वेळोवेळी वापरत आला आहे. मग हाच मुद्दा पुढे करत तो त्याला उद्देशून इतर प्रवाश्यांकडे नजर फिरवत बोलला,"ये लोग ऐसे ही होते है साले..बाहर सें आते है ईधर और होशियारी करतें है.. साला भैया कुठचा.."(हि एकंच ओळ काय तेवढी ह्या पठ्ठ्याने मराठीत बोलली बुवा..!!) "ये मी नाहीए भैय्या, मराठीच आहे मी", दुसरा पचकन बोलून मोकळा झाला.! दुस-याच्या ह्या उत्तराने मात्र डब्ब्यात क्षणार्धात चिडीचुप शांतता पसरली. ऐव्हाना आपण तोंडावर दनकन आपटलोय हे त्या दोघांच्याही लक्षात आलं होतं.  त्यामुळे त्यांचा चेहरा हा निवडणूकीमध्ये डिपोझिट जप्त झालेल्या एखाद्या नेत्यागत झाला होता..!!एकमेकांकडे खजीलपणे पाहण्याखेरीज आता त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता.  तेव्हा मग शांततेला संपावर पाठवत डब्ब्यामध्ये हसण्याचा भोंगा वाजू लागला. डब्ब्यातील सर्वांचीच हसून हसून पार हालत खराब झाली होती आणि ते दोघे बिच्चारे पुढचं स्टेशन येण्याची वाट चातकाप्रमाणे बघत होते. शेवटी एकदाचं स्टेशन आलं आणि ह्यांनी जराही विलंब नं लावता सरळ डब्ब्यातून धूम ठोकली..!!

तात्पर्य : उगाच नको तिथे हिंदीची लाचारी पत्करून असं चार चौघांत स्वतःचा डब्बा गूल करू नका...!!!

- सतीश रमेश कांबळे.

Friday, July 28, 2017

अनोळखी- एक भयकथा ( 8th Part)

आईच्या आठवणीतंच सकाळ उजाडली.. सर्व आटोपून मी निघण्याची तय्यारी करू लागले.. जास्त लवाजमा सोबत नव्हता घेतला.. दोन जोडी कपडे आणि काही आवश्यक वस्तूच घेतल्या होत्या बॅगेत.. सकाळी अकराच्या आसपास एसटी कुर्ला आगारातून सुटली, ती पंधारवाडीला जाण्यासाठी.. प्रवास साधारण सहा ते सात तासांचा होता.. पण, अर्ध्या वाटेत एसटी बंद पडल्यामुळे पंधारवाडीला पोहचायला खुपंच ऊशीर झाला.. संध्याकाळी सहाला पोहोचणारी एसटी तेव्हा रात्री साडेअकराला पोहोचली होती.. एसटीमध्ये प्रवासीदेखील जेमतेमंच उरले होते.. पंधारवाडी स्टँड आलं आणि मी एसटीमधून उतरले.. त्याकाळी गावात वीज नव्हती.. पण, तरीही त्या स्टँडवर एक विजेचा टिमटिमता दिवा होता.. बाकी एसटी स्टँड वाटावं असं तिथं काहीच नव्हतं.. साधं बसायला एक बाकडाही नव्हता.. मी हातातली बॅग जमिनीवर ठेवणारंच होते की, तेवढ्यात एसटीने माझ्यापासून चाळीस-पंन्नास मीटर अंतरावर जावून करकचून ब्रेक मारला.. एसटी जागच्या जागी थांबली.. धाडकन एसटीच्या पत्र्याचा दरवाजा उघडला आणि आतून चार प्रवासी खांद्यावर अडकवलेल्या भरभक्कम बॅगांसकट खाली उतरले.. त्यांना सोडून ती एसटी निघून गेली.. ही माणसं मुंबईपासूनंच माझे सहप्रवासी होते ह्या एसटीमध्ये.. एसटी जेव्हा वाटेत बंद पडली होती तेव्हा हे चारंही जण इतर प्रवाश्यांशी टवाळकी करत होते.. त्यांच्या वागण्यावरून ते सराईत गुन्हेगारंच वाटत होते.. त्यामुळे हे इथे असे अचानक उतरल्यामुळे सहाजिकंच माझ्या छातीत भितीने धडधडायला लागलं होतं.. माझ्याकडे नजर रोखून ते चौघेही गंभीर चालीने येवू लागले.. त्यांच्या मनात काहीतरी वाईट खदखदतंय ह्याचा अंदाजा मला त्यांच्या हावभावाने एव्हाना आला होता.. ते माझ्या दिशेने सरसावू लागले.. त्या प्रत्येकांच्याच चेह-यावर त्यावेळी एक कावेबाज हास्य खुललं होतं.. पुढचं ओळखून मी स्वतःला सावरत क्षणाचाही विलंब नं लावता तिथून पळ काढला.. ते चौघेही माझा पाठलाग करू लागले.. मी जास्त लांब नाही जावू शकले आणि थोड्याच अंतरावर त्यांनी मला गाठलं.. मी भितीने थरथर कापत होते अन ते नराधम एखाद्या क्रूर राक्षसाप्रमाणे हसत होते.. त्यातल्या एकाने त्याची खांद्यावरची बॅग काढून खाली काढून ठेवली अन पुढे होत माझे कपडे फाडायला लागला.. तश्या बाकीच्यांनीही बॅगा धडाधड जमिनीवर फेकून दिल्या आणि मला ओरबाडायला सुरूवात केली.. तसा त्यांचा हात जोरात झटकून मी कशीबशी तिथून निसटली..!!

ह्या अनपेक्षित घडलेल्या प्रसंगाने मी पूर्णपणे हादरून गेली होती.. भिती तर नसानसांत ऐवढी भिनली गेली होती की, थोड्याच वेळात भोवळ येवून मी तिथेच धाडकन कोसळले.. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा जाणवलं की, माझ्या अंगावर जवळ-जवळ जेमतेमंच कपडे शिल्लक होते.. त्या नराधमांनी त्यांचा डाव साधला होता.. माझ्या अंगात जराही त्राण उरला नव्हता.. डोळेसुद्धा जड झाले होते.. तेव्हा त्या चौघांचाही कुजबूजण्याचा आवाज माझ्या कानात घुमायला लागला.. ते मला मारून टाकायचा बेत आखत होते.. त्यांना हे प्रकरण पोलिसांपर्यंत जावू द्यायचं नव्हतं.. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी होती नव्हती तेवढी सगळी ताकद एकटवून उठून धावत सुटले.. ह्या नराधमांच्या तावडीत जर परत सापडले तर काय होईल ह्या नुसत्या विचारानेच माझ्या मनाचा थरकाप उडाला आणि मग माझ्या पळण्याचा वेगही आपोआपंच वाढला.. शेवटी धावून-धावून मी दमले.. मागे वळून पाहिलं तर ते चौघेही कुठेच दिसत नव्हते.. त्यामुळे थोडी उसंत खावी म्हणून मी थांबले.. लागलेल्या धापांना आवर घालत सहजंच बाजूला नजर टाकली तेव्हा लक्ष्यात आलं की, मी फिरून पुन्हा त्याच एसटी स्टँडवर आले होते..!! तो स्टँड बघून आता डोकं पार चक्रावून गेलं अन मग मी तिथेच हंबरडा फोडून रडू लागले.. त्यावेळेस माझं भानही हरवलं.. अश्यावेळी काय करावं काहीच सुचत नव्हतं.. शरीरानेही साथ द्यायचं टाळलं होतं.. तेव्हा अचानकंच ते चौघेही माझ्या पुढ्यात येवून उभे राहिले, मी तर आता हार मानली होती.. प्रतिकार करण्यासाठी अंगात जराही ताकद उरली नव्हती.. तेव्हा हात जोडत, जीवाची भिक मागत घायाल झालेला माझा जीर्ण देहं तिथेच जमिनीवर पडला.. मग तडक त्यातल्या एकाने माझी केसं पकडून तसंच फरफटंत स्टँडच्या कडेला नेलं.. फरफटल्यामुळे जमिनीवर विखुरलेल्या छोट छोट्या दगडी खड्यांनी माझं शरीर रक्तंबंबाळ झालं होतं.. त्याच अवस्थेत केसं मुठीत गच्चं धरूनंच त्याने मला उठवलं.. मी पडत धडपडत कशीबशी उठले.. पण, तेवढ्यात माझ्या पुढ्यात उभा असलेल्या दुस-या नराधमाने कसलाही विचार नं करता पोटात धारधार सुरा भोसकला.. त्या सु-याच्या घावाने माझं शरीर कळवलं अन एक जोरदार किंकाळी फोडून जमिनीवर तडफडत पडलं.. आता डोळ्यांपुढे ते चौघेही गरागरा फिरायला लागले होते.. माझी शुद्ध हरपली.. पण, तरीही आसपासचा आवाज घंटानादाप्रमाणे कानात घुमायला लागला होता.. माझ्या डोळ्यांची झापड अर्धवट उघडी होती.. त्यामुळे जे काय चालू होतं ते अस्पष्ट का होईना पण दिसत होतं.. अचानकंच बोलता- बोलता सावित्री शांत झाली.. अन क्षणार्धातंच घरात स्मशान शांतता पसरली.. सर्वजण एकमेकांकडे बघायला लागले.. कोणाला काहीच समजत नव्हतं.. तेव्हा मग हळूच तिच्या ईवळण्याचा आवाज घराची शांतता चिरत सर्वांच्या कानावर येवून दणकन आपटला.. तिने तिचं जळालेलं ओठ विस्कटून विद्रुप चेह-यावर उमटवलेलं भयाण हास्य अंगाचा थरकाप उडवत होता.. समीरकडे नजर रोखतंच सावित्री दुडक्या चालीने त्याच्याजवळ आली.. तिच्या डोळ्यांत आता रक्ताचे थेंब अश्रूंच्या स्वरूपात जमू लागले होते.. तिच्या तोंडातून निघणारी गरम वाफ त्याच्या तोंडावर जावून आदळत होती.. जळालेल्या चमडीचा वासही अजून उग्र होऊन घरभर पसरत होता.. डोळ्यांची बुब्बुळं भराभर फिरवत तिने आवंढा गिळून चिडलेल्या अन कर्कश आवाजात बोलू लागली- जिवंतपणीच मला नरकयातना देण्यासाठी त्यातल्या एका नराधमाने जास्त वेळ नं दडवता खिशातून लाईटर काढलं अन माझ्या कपड्याच्या टोकाशी धरलं.. त्या फाटलेल्या तुकड्यासोबतंच माझ्या जीर्ण आणि रक्ताळलेल्या शरीरानेही पेट घेतला.. मी खुपच हतबल झाले होते.. माझ्या शरीरात ओरडण्याइतपतंही अवसान शिल्लक राहिलं नव्हतं.. मुक्यापणे जळत रहाण्याखेरीज मला काहीच करता येत नव्हतं.. मी अगतिक झाले होते..

थोड्या वेळातंच आगीचे चटके गार पडू लागले.. मरणाची वाट बघत असलेल्या माझ्या सोशीक शरीरात अजूनंही जीव बाकी होता.. अर्धवट जळालेल्या माझ्या शरीरामधून मांस जळाल्याचा उग्र वास आणि निघणारा धूर स्टँडभोवती पसरत होता.. पण, त्या निर्दयी लोकांना माझी जराही कीव येत नव्हती.. तश्या अवस्थेतंच त्यांनी मला जवळंच खोदून ठेवलेल्या खड्डयात पुरून टाकलं.. बघता बघता काही क्षणातंच राहिलेल्या सर्व स्वप्नांचा झालेला चुराडा, मागे ठेवून मी माझा प्राण सोडला.. त्यांच्या हसण्याचा क्रूर आवाज हा मी ऐकलेला शेवटचा आवाज ठरला..!!

स्टँडजवळंच टाकलेल्या बॅगा पटापट उचलत ते आता काय करायचं ह्याचा विचार करू लागले.. आता रात्र खुप झाली होती.. त्यामुळे सकाळशिवाय कोणतंही वहान त्यांना मिळणं शक्य नव्हतं... त्याकाळी प्रवासाचं प्रमुख साधन बैलगाडी आणि एसटीच होती.. बैलगाडी ह्यावेळेस भेटणं शक्य नव्हतं अन एसटीची फेरीदेखील दिवसभरातून दोनदाच होती.. पहिली फेरी दुपारी तीनची आणि दुसरी फेरी संध्याकाळी सहाची.. आता पहाटेचे चार वाजत आले होते. थोड्याच वेळात सुर्योदय होणार होता... त्यामुळे स्टँडवर ताटकळत बसण्यापेक्षा त्यांना गावात जाणंच जास्त सोयीचं वाटलं.. जसं जमेल तसं चालत ते गावाच्या वेशीजवळ आले.. वेशीपासून गाव साधारण तीन-चार किलोमीटर लांब होतं.. ईथपर्यंत पोहोचायलाच त्यांना दोन तास लागला होता.. तोवर सुर्यदेखील उगवला होता.. त्यामुळे आजूबाजूचा परिसर आता प्रकाशामध्ये व्यवस्थीतपणे दिसायला लागला.. गावक-यांची आपापल्या शेतावर जाण्यासाठी लगबगही चालू झाली होती.. सारं वातावरण प्रसन्न वाटत होतं.. तेव्हा तिथूनंच बैलगाडी हाकत जाणा-या ग्यानबा नामक गावक-याला ते चौघेही मदतीसाठी अडवतात.. काही तासांपुरती गावामध्ये राहण्याची सोय करायला सांगून त्याबदल्यात त्याला जास्तीचे पैसेही देवू करतात.. पैश्यांच्या हव्यासापोटी त्याने त्या चौघांनाही त्याच्याच एका वापरात नसलेल्या खोपट्यामध्ये नेलं.. तिथेच त्यांना जेवणाचीही सोय करून दिली.. दारू तर त्या चौघांनीही सोबतंच आणली होती.. त्यामुळे त्यांच्या मनासारखं छान जमून आलं होतं.. सर्व आटोपून ते खोपट्याच्या बाहेरंच अंथरून ठेवलेल्या फाटक्या गोणपाटांवर येवून बसले.. आसपास एक फिरती नजर टाकून ते सर्व दारूच्या मैफीलीला सुरूवात करतात.. हे गाव त्यांच्या डोळ्यांना भावलं होतं.. गावाची हिरवळ डोळ्यांत साठवत ते दारूचे घोट रिचवत होते.. ग्यानबाने सर्व व्यवस्था चांगली करून दिली होती.. दारूचा प्याला घश्याखाली उतरवंत ते मैफीलीचा आनंद घेत होते.. आता सुर्यसुद्धा डोक्यावर आला होता.. दारूची धुंदीही त्या चौघांवर चांगलीच चढली होती.. त्यात रात्रभर झोपंही मिळाली नव्हती.. म्हणून नशेतंच ग्यानबाला हाक देवून ते सर्व आवरायला सांगतात.. पण, हाकेला ओ देण्यासाठी तो तिथे नव्हताच.. तो तर केव्हाचाच शेतातल्या कामासाठी निघून गेला होता.. दारूच्या धुंदीत त्यांना ते आठवत नव्हतं.. त्यामुळे एकसारखं ग्यानबाच्या नावाचा जाप त्यांनी सुरू ठेवला होता.. ऐवढा वेळ आवाज देवूनंही तो येत नाही हे पाहून त्यातला एक ग्यानबाच्या नावाने शिव्या हासडणारंच होता की, तेवढ्यात तिथे एक विशीतली तरूणी पायातल्या पैंजणांचा आवाज करत तिथे आली.. तिचं रूप त्या ऊन्हात लखलखंत होतं.. नववारीमध्ये झाकलेलं तिचं अंगं डोक्यावरच्या पदराने आणखीनंच शोभून दिसत होतं.. अश्या ह्या अप्सरेला पाहून त्या चौघांचीही वाईट नजर तिच्या सर्वांगावर रेंगाळते.. हापापलेल्या नजरेने ते तिला न्याहाळू लागतात.. ती मात्र तशीच लाजत, डोक्यावरचा पदर सावरत तिथेच उभी असते.. तेव्हा त्या चौघांपैकी एक स्वतःला सावरत तिला काही बोलाणारंच होता की, ते आधीच ओळखून तिच बोलते- " म्या इंदू.. ग्यानबा धायगुड्यांची ल्योक.. बा ने मला तुम्हासणी काय हव नगं ते संमदं बगायला धाडलंया.." तिच्या ह्या असल्या मादक आवाजाने त्यांना जागच्या जागीच पार घायाळ करून टाकलं होतं.. कोणालाच कशाची शुध्दं नव्हती.. मग ती तशीच पैंजणांचा आवाज करत मटकत त्यांच्या पुढ्यात येवून, रिकाम्या झालेल्या दारूच्या बाटल्या आणि खरकटी भांडी आवरून तिथून आली तशीच निघूनंही जाते.. त्या चौघांच्या डोळ्यांत आता मात्रं तिचीच नशा चढलेली असते.. तिच्या त्या मादक आठवणीतंच ते धुंद होवून तिथेच गोणपाटावर अंगं टाकून झोपी जातात.. रात्री जागरण झाल्यामुळे पडल्या जागी त्यांना गाढ झोप लागते..!!

सायंकाळचे साडेचार वाजत आले होते.. तेव्हा कसल्याश्या तरी आवाजाने त्यातल्या एकाला जाग आली.. डोळे चोळतंच तो आजूबाजूला नजर फिरवतो.. त्यासरशी छमम छमम पैंजणांचा आवाज करत इंदू त्याच्या पुढ्यात येवून उभी रहाते, तशी ह्याच्या ओठांची पाकळी खुलते.. " पावणं, आता दिस मावळाया लागलाय.. तवा तुम्हासणी स्टँडपतुरचा परवास तासाभरात पुरा करायचा आसल तर, आसं गावाला हेलपाटा मारून नका जावु.. म्या सांगतेया त्या वाटेनी जावा, लगीच तासाभरात स्टँडवर पोहचाल.." तिच्या ह्या मादक आवाजातलं बोलणं ऐकून तो हुळरून जातो.. तसाच जाग्यावर उभा राहून तो नुसतं तिला न्याह्याळाला लागतो.. त्याचं न्याह्याळणं चालूच असतं पण ती पटकन जावून अगोदरंच सोय करून ठेवलेली बैलगाडी खोपट्याजवळ घेवून येते.. बैलांच्या घुंगरांच्या आवाजाने इतर तिघांनाही जाग येते.. तेव्हा त्यांचा पहिला मित्र राजेश त्यांच्याकडे वळत बोलतो, "बघा मित्रांनो, इंदूने आपल्याला स्टँडवर जाण्यासाठी ह्या बैलगाडीची सोय केली आहे.." राजेशच्या बोलण्याने तिघेही चकीत होतात.. कारण, त्यांना बैलगाडी तर दिसत होती पण इंदू कुठेच दिसत नव्हती..!!
"काय झालं रे..? असे का बघताय.?" मित्रांना गोंधलेलं पाहून राजेश विचारतो..
" बैलगाडी तर दिसतेय पण, इंदू कुठेय.?" सागर आश्चर्याने विचारतो..
"अरेरे, हि काय इंदू बैलगाडीजवळंच तर उभी आहे " असं बोलत राजेश मागे नजर वळतो.. त्यासरशी त्याला एक जोरदार धक्का बसतो.. कारण, तिथे नुसती बैलगाडीच उभी होती.. इंदू तर आसपास कुठेच दिसत नव्हती..!! काही सेकंदापुर्वीच तर ती इथे होती मग आता ऐवढ्या लगेच अशी कशी काय गायब झाली..? राजेश स्वतःच्याच मनाला विचारू लागतो.. शेवटी स्वतःचीच समजूत काढत, गेली असेल घरी असं मनाला पटवून देत तो ह्या विषयाला बगल देतो.. आता पाच वाजत आले होते.. त्यामुळे पटापट आवरून ते गाडीत येवून बसायला लागतात.. तेव्हा "अरेरे.. पण, बैलगाडी हाकणारा कुठेय.? इंदूने तर नुसती बैलगाडीच दिली आहे. गाडीवान कुठेय.? " त्यातला तिसरा नराधम वसंत खिजगणीतून सुटलेल्या समेस्येकडे सर्वांचं लक्ष्य वेधतो.. " गाडीवान हवाय व्हय.? मग म्या कोण हाय.?" एक भारदस्त आवाज अचानक त्यांच्या कानावर दनकन येवून आदळतो..!!

क्रमश:

लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh


DMCA.com Protection Status

Wednesday, July 5, 2017

ताई ... अर्थ दुसरा आईचा ( कविता )

सोडून ह्या भावाला अशी अलगद वा-यावरती
चालली बघा सासरी ताई माझी..

होत्या घरभर पाऊलवाटा
तिच्या उमटलेल्या..
डोळ्यांना त्या आधार होता
घट्ट मिटलेल्या..

येईल आठवण क्षणाक्षणाला
मागील घडलेल्या..
देवून जातील डोळ्यांस अश्रू
ओस पडलेल्या..

थकलेल्या आईच्या पायास स्पर्श तिचा जाणवेल
'आयुष्यमान हो तू' अशी नकळत ती म्हणेल..

येईल भानावर जेव्हा
खडबडून जागी होईल
डोळे चिंब भिजलेले मग
आठवणीत विरून जाईल..

छोट्या मोठ्या कामात तो
हात तिचा लागेल..
खोटी आस ही आता
मनी दुरूनंच शोभेल..

चकाकणा-या त्या भांड्यांवरून
हात जेव्हा फिरेल..
तुझाच स्पर्श पदोपदी
ताई हातांस ह्या जाणवेल..

रीत ही जरी असली तरी
मन सारखं म्हणतं..
बहीण सोबत राहून अचानक
करून टाकते परकं..

मन आमचं म्हणतं
तू सुखी सदा राहशील..
पण तरीसुद्धा ताई तु
आठवण आमची काढशील..

कवी : सतीश रमेश कांबळे.


DMCA.com Protection Status

Thursday, June 29, 2017

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part )

समीरच्या डोळ्यांत मांत्रिकाला जे काही दिसलं त्याने मांत्रिकाच्या डोळ्यांतील बुब्बुळेच पार दिसेनाशी करून टाकली होती.. अचानक हळू-हळू मांत्रिकाचं साधारण रूप बदलायला लागलं.. अन सर्वांची नजर मांत्रिकावर जावून खिळली.. अर्धा टक्कल पडलेल्या त्याच्या डोक्यावर आता अर्धवट जळालेली केसं उगवायला लागली होती.. ती केसं वाढत जावून गुडघ्यापर्यंत रेंगाळायला लागली.. घरातील इतर मंडळींचा ह्यावर विश्वासंच बसत नव्हता.. प्रत्यक्ष डोळ्यांदेखत घडत असूनदेखील ते मानायला त्यांचं मन धजत नव्हतं.. पण, सर्व परिस्थिती समोर होती आणि जे घडत होतं ते सत्य होतं.! अर्धवट जळालेल्या केसांआडून दिसणारा मांत्रिकाचा चेहरासुद्धा आता स्त्रीरूपात बदलला होता.. त्या जळालेल्या चेह-यामधून ठिकठिकाणांतून रक्ताने माखलेली कातडी लटकत होती.. चमकदार मोत्यांच्या दातांऐवजी आता जळून काळेठिक्कर पडलेले दात दिसायला लागले होते.. जी पाहताच छातीत धडकी भरत होती.. असा तो विद्रुप चेहरा बघितल्यावर सा-यांनी एकसाथ भितीने जोर-जोरात किंकाळ्या फोडल्या.. बदलत्या क्षणासोबत त्या मांत्रिकाचं रूपही बदलत चाललं होतं.. एव्हाना घराबाहेरचं वातावरणसुद्धा बदललं होतं.. शुभ्र पांढ-या ढगांची जागा आता काळ्याकुट्टं ढगांसोबतंच कडाडणा-या विजांनी घेतली होती.. मंदं वाहणारी हवासुद्धा घराच्याभोवती आता जोरात वाहू लागली होती.. दारे खिडक्या एकमेकांना धडाधड आपटत होते.. घराबाहेर अचानकंच जमलेले कुत्रे वर काळ्याकुट्टं ढगांकडे बघत एका विचित्र सूरात ईवळायला लागले होते.. पूर्ण वातावरणंच झटक्यात बदललं होतं..!!

बाहेरचं वातावरण जेवढं भयंकर होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने घराच्या आतलं वातावरण झालं होतं.. कारण, मांत्रिकाचं शरीर आता पूर्णपणे एका विद्रुप दिसणा-या स्त्रीच्या रूपात बदललेलं होतं.. ती विद्रुप बाई बुब्बुळे नसल्याने पांढरे पडलेल्या डोळ्यांनी सर्वांकडे चेहरा वेडा वाकडा करून बघत होती.. अचानक बाजूलाच खाटेवर बेशुद्धावस्थेत पडलेल्या समीरकडे तिची मान वळली आणि त्याच्या दुस-याच क्षणाला लगेचंच समीर शुद्धीवर आला.. समीर शुद्धीवर आला ह्याचा आनंद साजरा करायचा की पुढ्यात उभी असलेली ही विद्रुप दिसणारी बाई बघून दुखवटा करायचा.? अशी दुहेरी मनस्थिती घरातल्या मंडळींची त्यावेळेस झाली होती.. समीरला इथे कसा आलो हे समजत नव्हतं.. तो डोळे चोळत समोर बघतो तेव्हा त्याला प्रसाद आणि त्याच्या घरातील इतर मंडळी दिसतात..विजा कडाडण्याचा, दारे खिडक्या हवेमुळे धडाधड आपटण्याचा आणि कुत्रे ईवळण्याच्या आवाजाकडे त्याचं जराही लक्ष जात नाही.. कारण, घरातील सर्वांना बघून समीरला हायसं वाटत होतं.. गावात आल्यापासून त्याला फक्त आणि फक्त अतृप्त आत्मेच दिसले होते.. त्यामुळे साहजिकंच जिवंतं माणसं बघून त्याच्या भेदरलेल्या मनाला एक विलक्षण शांती मिळाली होती.. पण, ती शांती काही क्षणातंच त्याच्या चेह-यावरून मावळते.. कारण, प्रसादसोबतंच त्याचा पूर्ण परिवार घराच्या कोप-यात उभे राहून भितीने नुसते थरथर कापत होते.. त्या सर्वांना भितीने थरथर कापताना पाहून तो थोडा गोंधळतो.. त्याच गोंधळलेल्या अवस्थेत तो सर्वजण भितीने ज्या खाटेशेजारी बघत असतात तिथे हळूच नजर वळवतो.. त्याची नजर आधी जमिनीवर जाते.. आणि सर्वांत आधी त्याला दिसतात जळालेले मानवी पाय.. ते पाय बघून त्याला वर बघण्याची हिंम्मतंच होत नाही.. तश्याच अवस्थेत तो खाटेच्या दुस-या बाजूने उडी मारून तडक प्रसादला खेटून उभा रहातो.. चेहरा तळहातामध्ये लपवून तो थरथरायला लागतो.. तेव्हा ऐवढा वेळ नुसतं वेडी वाकडी मान फिरवून उभी असलेली ती बाई घोग-या भसाड्या आवाजात विक्षिप्त हसत बोलते, " समीर.. घाबरलास काय रे मला.. अशी नजर का लपवतोयस.. बघ माझ्याकडे.. मी सावित्री.. हाहाहाहाऽऽ.." सावित्री नाव ऐकताच समीरचे डोळे चमकतात.. आपोआपच त्याची नजर तिच्या दिशेने वळते.. आणि मग तिचं ते विद्रुप रूप पाहून तोंडातून पटकन शब्द बाहेर पडतात.. " हाच तो जळालेला चेहरा आहे जो मला मोबाईलमध्ये दिसला होता.. हो हिच आहे ती सावित्री जिला काल रात्री मी स्डँडजवळ पाहिली होती.." सगळे समीरकडे आ वासून बघायला लागतात.. समीर असा बहेकल्यावाणी का बोलतोय हे त्यांना कळत नव्हतं.. साहजिकंच त्यांना त्यामागचं खरं कारण अजूनंही कळलं नव्हतं.. हा गुंता आता जास्तंच वाढत जात होता.. शेवटी आजीने पुढाकार घेवून तिचे सुरकुतलेले हात सावित्रीपुढे पसरले.. थकलेले गुडघे जमिनीवर कसेबसे टेकवले आणि थरथरत्या आवाजात तिला साकडं घालू लागली. " आम्हच्या जीवाला ह्यो असा घोर कशापायी लावून ठेवलंसा.. ह्या गरीब पोराच्या मागं का ऐवढी पडलीस.? काय पाईजिल तुला..?? " आजी होता नव्हता सर्व जोर काढून बोलली.. थोडावेळ घरात शुकशुकाट पसरला.. बाहेरचा आवाजसुद्धा अचानक शांत झाला..ऐवढ्या शांततेत एकमेकांच्या श्वासोच्छवासाचा आवाजसुद्धा पुर्ण घरभर पसरत होता.. ह्यादरम्यान कोणीच एकही शब्द तोंडातून काढला नाही.. ती विद्रुप बाईसुद्धा शरीर थंड पडल्यागत शांत उभी होती..पण ही शांतता बरंच काही राहून गेलेलं सांगण्यासाठी स्वतःला कदाचित सज्ज करत होती.. आणि झालंही अगदी तसंच.. ऐवढावेळ शांत उभी असलेली ती तिच्या भसाड्या घोग-या आवाजात अंगाला शहारे आणणारा एक शब्द उच्चारते.."सूऽऽऽड.." तिने हा शब्द उच्चारला आणि अचानक तिच्या शरीरातून मांस जळलेला उग्र वास यायला लागला.. सर्वांचेच हात आपोआपंच आपआपल्या नाकांवर गेले.. पण, तिच्या भितीने ते लगेचंच खाली आले... आगीच्या एका छोट्याश्या ठिणगीने तिच्या पायाचं मांस जाळायला सुरूवात केली होती.. त्यामुळे तो उग्र वास येत होता आणि हळूहळू घरभर पसरत होता..!!

बाहेरचा थांबलेला आवाज आता पुन्हा यायला लागला.. विजांचं कडाडणं.., दारा खिडक्यांचं आपटणं.. कुत्र्यांचं ईवळनंही परत एकदा सुरू झालं होतं.. आवाजांच्या ऐवढ्या कलकलाटातही तिचा तो घोगरा भसाडा आवाज परत सर्वांच्या कानावर येवून आदळला.. " समीरऽऽ.. तुझ्यासोबत आणि तुझ्यासमोर रात्री जे काही घडलं होतं त्यामागचं खरं कारण आता मी तुझ्याबरोबरंच ह्या खोलीत असलेल्या ह्या सर्वांनाही सांगणार आहे.. पण एक गोष्ट लक्षात ठेवाऽऽ.. कोणीही ह्यादरम्यान तोंडातून एकही शब्द बाहेर काढता कामा नयेऽऽ.. कोणी चुकूनंही तसा प्रयत्न जरी केला तरी त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी स्वतःचा आवाज कायमस्वरूपी हरवून बसावा लागेलऽऽऽ हाहाहाहाऽऽऽ" ... तिच्या ह्या चेतावणीने सारेच स्तब्ध झाले... तिच्या आवाजामध्ये चिड होती, वेदना होत्या, एक अनामिक भिती होती आणि राक्षसी हास्यसुद्धा होतं... ती परत तिच्या घोग-या भसाड्या आवाजात बोलू लागली.. तिची काळाच्या पडद्याआड लपलेली कहाणी सांगू लागली..!!!

माझं पूर्ण नाव सावित्री खाशाबा टिके.. ह्याच गावची.. ही गोष्ट आहे सत्तर- ऐंशी वर्षांपूर्वीची.. मी जवळपास चार वर्षांची असेल त्यावळेस जेव्हा माझ्या वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.. वडील आम्हाला सोडून गेले पण त्यांच्या अश्या अचानक जाण्याचं दुःखं आई सहन करू शकली नाही.. तिला मानसिक धक्का बसला आणि ती वेडी झाली.. त्या वेड्याच्या भरात ती पूर्ण गावभर फिरत रहायची.. येणा-या जाणा-यांकडे मळकट फाटलेला पदर पसरून पैसे मागायची अन मिळालेले पैसे कर्जदारांच्या दारात जावून फेकायची.. असंच एकदा ती गावात भटकत असताना जी चूकून गावाबाहेर गेली ती परत कधी माघारी आलीच नाही.. त्या दिवसापासून तिला गावात फिरताना कोणीच पाहिलं नाही.. काही देव माणसांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला.. पण.. सारंच व्यर्थ.. ती सापडली नाही आणि माझ्या नशिबात चौथ्या वर्षीच अनाथाचं आयुष्य जगण्याची वेळ आली.. कर्जबाजारामुळे घरदारासोबत जे काही होतं नव्हतं ते सगळं कर्जदारांनी ताब्यात घेतलं.. त्यामुळे मीसुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार फिरू लागली.. गरीब अनाथ मुलगी म्हणून रोज कोणी ना कोणी घरातलं उरलं सुरलं मला खायला देत होते.. त्याने पोट भरत नसलं तरी जगण्यासाठी तेवढं पूरेसं होतं.. दिवसांमागून दिवस गेले.. माझा दिनक्रम तसाच चालू होता.. मग एकेदिवशी गावात मुंबईला राहणारा माझा लांबचा काका आला.. त्याने मला त्याच्यासोबत मुंबईला नेलं.. ब्रम्हचारी असल्यामुळे काकांनी लग्न केलं नव्हतं.. सांगायला असं त्याचे सगेसोयरे कोणीच नव्हतं.. त्यामुळे आम्हा दोघांनाही एकमेकांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं.. काकांनी माझा मुलीगत सांभाळ केला.. मला चांगलं शिक्षण दिलं.. मी पदवीधर झाले अन एका चांगल्या हुद्दयावर कामाला लागले.. तोपर्यंत काका आजारपणामुळे पार खंगून गेले होते.. शेवटी काही महिन्यांनी त्यांना मरण आलं.. आणि मी परत एकदा अनाथ झाले..!!

काकांच्या मृत्युनंतर मी एकटी पडली होती.. सकाळ कामानिमित्त बाहेरंच जात असल्यामुळे काही वाटायचं नाही.. पण, रात्रीचं मात्र घर खायला उठायचं.. रोजचा तोच तो एकटेपणा आता नकोसा वाटत होता.. अश्याच एका रात्री मी एकटेपणाला कंटाळून बिछाण्यावर सारखी कूस बदलत झोपण्याचा प्रयत्न करत होती.. तेव्हा काय माहीत पण अचानक गावाकडचं आयुष्य डोळ्यांसमोर घर करू लागलं.. मला आई दिसायला लागली.. तिला मानसिक धक्क्यानं आलेलं वेडेपण दिसू लागलं आणि त्याच भरात ती गाव सोडून गेल्याचंही आठवू लागलं.. जुन्या आठवणी डोळ्यांपुढे आल्या आणि त्याच आठवणींत मी बैचेन मनाने झोपी गेले.. पण, रात्री अचानक भितीने दचकून जागी झाली.. घड्याळाकडे बघितलं तर एक वाजून गेले होते.. अंगाला दरदरून घाम फुटला होता.. छाती भितीने जोरात धडधडत होती.. तोच चेहरा इतक्या वर्षांनी आज एवढा स्पष्टपणे दिसला होता.. कपाळभर विस्कटलेलं कुंकू होतं..काळेभोर टपोरे डोळे सैरावैरा भिरभिरंत होते.. गळ्यात तुटून लटकत असलेलं मंगळसूत्र.. अंगावर मळकट साडी आणि हातात तुटलेल्या बांगड्यांचं अवशेष.. होय..ती माझी आई होती.. असाच काहीसा अवतार होता तिचा बाबांच्या मृत्युनंतर.. ती पहिल्यांदाच माझ्या स्वप्नात आली होती.. मला परत गावाला बोलवत होती.." पोरी.. मला एकटीला टाकून तू मंबईला गेलीस..म्या तुजी आजपतूर गावाकडं वाट बघतीय.. ये.." तिचं काळजाला पिळून टाकणारे शब्द त्या रात्री सतत कानात घुमत होते.. आई खरंच असेल का..?? ती अजूनंही माझी वाट बघत असेल का..?? त्यावेळी प्रश्न तर डोक्यात खुप सारे होते आणि त्याचं उत्तर मला फक्त गावाकडेच मिळणार होतं.. म्हणून मी ठरवून टाकलं.. सकाळी मिळेल त्या एसटी ने गावाला जायचं.. आणि आईला शोधायचं...

(क्रमशः)


लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh


DMCA.com Protection Status

Monday, June 19, 2017

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part )

कांदा लावा ह्याच्या नाकाला...
नाही.. कांदा नको चमड्याची चप्पल लावा नाकाला..
डाॅक्टरांना फोन करून तास उलटून गेला पण डाॅक्टरांचा अजून पत्ता नाहीए.. घरात नुसती सर्वांची धावपळ चालली होती.. समीरला शुद्धीवर आणण्यासाठी सर्वजण आप-आपल्या परीने उपाय सुचवत होते.. समीर जेव्हा त्या बसस्टाॅपजवळ बेशुद्धावस्थेत पडला होता तेव्हा ह्याच लोकांनी त्याला त्यांच्या घरी आणलं होतं.. ही मंडळी तिच होती ज्यांच्याकडे समीर लग्नासाठी आला होता.. होय, हे त्याच्या मित्राचंच घर होतं..!! त्याचा मित्र प्रसाद डाॅक्टरांची वाट बघत-बघत घराच्या ह्या कोप-यापासून त्या कोप-यापर्यंत बैचेन होवून येरझ-या मारत होता.. बाकीचे घरातील मंडळी त्यांना होईल तसं प्रयत्न करून समीरला शुद्धीवर आणण्याचा खटाटोप करत होते.. पण, काही केल्या कोणाच्याच प्रयत्नांना म्हणावं तसं यश येत नव्हतं.. घरात लग्नाचं वातावरण आणि त्यात असलं अपशकून, ह्यामुळे घरातील जुनी जाणती लोकं चिंतेत पडली होती.. मग नं रहावून शेवटी त्यांच्यातल्याच एका आजीबाईने त्यांना मांत्रिकाला बोलवायला सांगितलं.. साहजिकंच घरातल्या शिक्षित मंडळींनी ह्याला विरोध दर्शवला..
प्रसादसुद्धा आजीवर चिडलाच, " हे मांत्रिक-बाबा वगैरे बोगस असतात आजी.. ह्याला डाॅक्टरांनाच दाखवावं लागेल.. तुमचा मांत्रिक काही करू शकणार नाही ह्यामध्ये.." प्रसादच्या खेकसण्याने आजी जरा हिरमुसली पण तरीही ती तिच्या मताशी अगदी ठाम होती.. " तुम्ही आजकालची पोरं..चार बुकं काय वाचली स्वतःला देवंच समजाया लागताय..पण पोरा, हे संमधं दिसतंय तेवढं साधं न्हाय..ऐक माझं.." आजी पार हृदयापासून बोलत होती.. घरातील काही मंडळींना हे पटत होतं.. कारण, त्यांनाही गावाकडची परिस्थिती चांगलीच माहीत होती.. पण, प्रसादला हे सर्व बालिशपणाचं लक्षण वाटत होतं.. त्याचं भूत-प्रेतांवर जराही विश्र्वास नव्हता.. त्यामुळे मांत्रिकाला बोलावण्यासाठी त्याचा साफ विरोध होता आणि त्याने तसं घरच्यांना खडसावून सांगितलंदेखील.. घरातली मंडळी हे कधीच प्रसादच्या बोलण्याबाहेर जात नसत.. त्यांना त्याचा स्वभाव चांगलाच माहिती होता.. डाॅक्टर अजून कसे आले नाहीत ह्या विचाराने तो बैचेन होत होता..
"अरेऽऽ..परत एकदा त्या डाॅक्टरला फोन करून बघ ना, कुठपर्यंत पोहोचलेत ते तरी समजेल.." त्याचे वडील आता नं रहावून बोलले.. प्रसादने डाॅक्टरांना फोन करण्यासाठी मोबाईल खिशातून काढला.. अन फोन लावणारंच होता की तेवढ्यात मागून कोणीतरी ओरडलं, "ते बघा, डाॅक्टरसाहेब आले.." प्रसाद पटकन पुढे होवून डाॅक्टरांच्या हातातील बॅग घेत बोलतो, " काय डाॅक्टर, किती ऊशीर..माझा मित्र बघा अजून शुद्धीवर आला नाहीए.." डाॅक्टर त्याला शांत करत समीरच्या दिशेने येतात.. समीरच्या खाटेशेजारच्या स्टूलवर बसून ते त्याला तपासायला लागतात.."हम्म..हार्ट रेट खुप वाढला आहे आणि शरीरसुद्धा थंडं पडलं आहे.. कदाचित खुप घाबरल्यामुळे त्याला चक्कर आली असावी.. मी गोळ्या देतो लिहून ते वेळेवर द्या.. येईल शुद्धीवर .. एक इंजेक्शन देतो मी आता ह्याला.. त्याने जरा बरं वाटेल.." डाॅक्टर इंजेक्शनची तय्यारी करतंच बोलतो..
"डाॅक्टर, घाबरण्यासारखं काही कारण नाहीए ना..??" प्रसाद थोड्या दबक्या आवाजात डाॅक्टरांना विचारतो..
"नाही नाही.. घाबरण्याचं काही कारण नाहीए.. मी इंजेक्शन दिलंय.. तेव्हा आराम करू द्या ह्यांना.. होतील बरे.." डाॅक्टर प्रसादला धीर देत बोलतो.. हातात औषधांची चिठ्ठी देवून डाॅक्टर निघून जातात.. प्रसाद ती चिठ्ठी बंड्या काकांना देवून औषधे आणायला पाठवतात.. सर्वजण समीरच्या खाटेशेजारी जमा होतात.. सर्वांच्याच चेह-यावर एक भिती स्पष्ट जाणवत होती..
" ऐवढा लांबून आपल्या इथे लग्नकार्यासाठी आला बिच्चारा आणि हे काय होवून बसलं बघा.." प्रसादची आई कपाळावर हात ठेवून पुटपुटते..
"काय रे प्रसाद , तुझा मित्र तर येणार नव्हता ना लग्नाला.. मग हा असा अचानक कोणालाही नं कळवता कसा काय आला??" प्रसादचे वडील आश्चर्याचा सूर आणत विचारतात.. प्रसादच्या डोक्यातही खरं तर हाच विचार कधीपासून घोळत होता.. कारणही तसंच होतं.. जेव्हा समीरला लग्नाचं निमंत्रण दिलं होतं तेव्हा त्याने येण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता.. ऑफिसमधून सुट्टी भेटणार नाही असलंच काहीतरी कारण त्याने सांगितलं होतं.. मग असं असताना हा असं नं सांगता अचानक कसा काय आला..?? समीर तर कधी अश्या प्रकारचा हलगर्जीपणा कधीच करत नाही.. मग ह्यावेळेस त्याने काही नं कळवता कसा काय आला..?? "अरे बोल की प्रसाद.." प्रसादचे वडील खेकसावून बोलतात.. प्रसाद त्यांच्या खेकसवण्याने विचारांच्या गुंतागुंतीमधून दचकून बाहेर येतो..
"मलाही काही कळत नाहीए बाबा.. लग्नाला येणार नाहीए हे त्याने मला आधीच कळवलं होतं.. मग असा अचानक.." प्रसाद बोलता-बोलता पुन्हा विचारात जातो..
"माझं येका पोरांनो, त्या मांत्रिकास्नी निरोप धाडा.. त्योच सांगल संमदं.. ह्यो गुंता डाक्टराच्या अवसंधानं सुटायचा न्हाय.."
आजी पुन्हा जीव ओतून बोलली.. समिरसुद्धा अजून शुद्धीवर आला नव्हता.. डाॅक्टरांच्या औषधांचा म्हणावा तसा परिणाम त्याच्यावर झाला नव्हता.. आणि त्यातंच लग्नसुद्धा दोन दिवसांवर येवून ठेपलं होतं.. म्हणून मग शेवटी नाईलाजाने प्रसाद आजीचं बोलणं ऐकून मांत्रिकाला आणण्यासाठी राजी होतो.. बंड्याकाका तडक उठून कोणी सांगाण्याच्या आधीच मांत्रिकाला बोलवायला निघून जातात..!!

काही वेळाने बंड्याकाका मांत्रिकाला घेवून येतात.. त्या मांत्रिकाला पहिल्या नजरेत बघितल्यावर तो खरंच मांत्रिक आहे का असा प्रश्न प्रसादच्या डोक्यात आला.. कारण, ह्या मांत्रिकाचा वेश तसा नव्हता जसा मूव्हीजमध्ये दाखवतात.. गळ्यात कवट्यांची माळ, अंगावर काळी कपडे, लांब-लांब केसं आणि कपाळावर अंगारा मळलेला काळाकुट्टं चेहरा.. ह्यापैकी काहीच नव्हतं.. ह्याचा वेश तर एखाद्या साध्या माणसासारखाच होता.. त्याने अंगावर सफेद रंगाचा फुल हाताचा शर्ट आणि काळी पँट घातली होती.. अंगाने तो थोडा भरभक्कमंच होता.. डोळ्यांत एक वेगळाच तेज होता त्याच्या.. " या या बुवा.. आता तुम्हीच हा गुंता सोडवू शकता.." प्रसादचे वडील अगतिक होवून मांत्रिकाला बोलले.. मांत्रिक काहीच नं बोलता सरळ समीरजवळ आला.. त्याने सोबत आणलेला अंगारा हाताच्या मुठीत घट्ट पकडून कसला तरी मंत्र पुटपुटतो.. मग झपकन डोळे उघडून ती अंगा-याने भरलेली मुठ समीरच्या कपाळावर मळतो.. आता पुढे काय होणार ह्या आशेने सर्वजण श्वास रोखून पहायला लागतात.. अंगारा कपाळावर मळल्याबरोबर समीरच्या शरीराला एक जोरदार झटका बसतो.. आणि त्या आकस्मित झटक्याबरोबरंच त्याचे डोळे झपकन उघडतात.. समीरचे डोळे आता पुर्ण पांढरे झालेले होते.. हा नजारा बघून घरातली मंडळी हादरून जातात.. प्रसादसुद्धा डोळे फाडून ते सारं पहात होता.. मांत्रिक आता समीरच्या डोळ्यांत पहायला लागतो.. त्याची नजर समीरच्या डोळ्यांत काहीतरी शोधत असते.. आणि थोड्याच वेळात त्या मांत्रिकाला ते दिसतं ज्यामुळे हे सर्व घडलं असतं..

क्रमशः

लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh



DMCA.com Protection Status