Saturday, November 4, 2017

ओढ... ( कविता )

भेटायची ओढ होती
तरी भेटण्याची वेळ नव्हती
बोलावसं वाटलं तरी
बोलण्याची वेळ नव्हती
सांगावसं वाटत होतं
तरी सांगण्याची वेळ नव्हती
ती वेळंच जणू अशी
माझ्यावर रूसली होती...

ती समोर होती, मी समोर होतो
नजरेला नजरसुद्धा भिडत होती
हलकेच नजर चोरून मी
मग नजर तिची चुकवत होतो
बदललो नव्हतो मी नक्कीच
तरी बदलल्यागत वागत होतो
जाणून-बूजून मी तेव्हा
माझ्या मनाशीच खेळत होतो...

संपलं नव्हतं नातं तरी
का संपल्यागत ते भासत होतं..??
अस्तित्त्व तिचं असूनसुद्धा
नाकारावसं वाटत होतं
नजरेसमोर होतं सगळं
तरी नजरेआड सारं गेलं होतं
शोधून-शोधून थकण्यापेक्षा
आता विसरण्यातंच सारं भलं होतं...


कवी : सतीश रमेश कांबळे.

DMCA.com Protection Status