Monday, June 19, 2017

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part )

कांदा लावा ह्याच्या नाकाला...
नाही.. कांदा नको चमड्याची चप्पल लावा नाकाला..
डाॅक्टरांना फोन करून तास उलटून गेला पण डाॅक्टरांचा अजून पत्ता नाहीए.. घरात नुसती सर्वांची धावपळ चालली होती.. समीरला शुद्धीवर आणण्यासाठी सर्वजण आप-आपल्या परीने उपाय सुचवत होते.. समीर जेव्हा त्या बसस्टाॅपजवळ बेशुद्धावस्थेत पडला होता तेव्हा ह्याच लोकांनी त्याला त्यांच्या घरी आणलं होतं.. ही मंडळी तिच होती ज्यांच्याकडे समीर लग्नासाठी आला होता.. होय, हे त्याच्या मित्राचंच घर होतं..!! त्याचा मित्र प्रसाद डाॅक्टरांची वाट बघत-बघत घराच्या ह्या कोप-यापासून त्या कोप-यापर्यंत बैचेन होवून येरझ-या मारत होता.. बाकीचे घरातील मंडळी त्यांना होईल तसं प्रयत्न करून समीरला शुद्धीवर आणण्याचा खटाटोप करत होते.. पण, काही केल्या कोणाच्याच प्रयत्नांना म्हणावं तसं यश येत नव्हतं.. घरात लग्नाचं वातावरण आणि त्यात असलं अपशकून, ह्यामुळे घरातील जुनी जाणती लोकं चिंतेत पडली होती.. मग नं रहावून शेवटी त्यांच्यातल्याच एका आजीबाईने त्यांना मांत्रिकाला बोलवायला सांगितलं.. साहजिकंच घरातल्या शिक्षित मंडळींनी ह्याला विरोध दर्शवला..
प्रसादसुद्धा आजीवर चिडलाच, " हे मांत्रिक-बाबा वगैरे बोगस असतात आजी.. ह्याला डाॅक्टरांनाच दाखवावं लागेल.. तुमचा मांत्रिक काही करू शकणार नाही ह्यामध्ये.." प्रसादच्या खेकसण्याने आजी जरा हिरमुसली पण तरीही ती तिच्या मताशी अगदी ठाम होती.. " तुम्ही आजकालची पोरं..चार बुकं काय वाचली स्वतःला देवंच समजाया लागताय..पण पोरा, हे संमधं दिसतंय तेवढं साधं न्हाय..ऐक माझं.." आजी पार हृदयापासून बोलत होती.. घरातील काही मंडळींना हे पटत होतं.. कारण, त्यांनाही गावाकडची परिस्थिती चांगलीच माहीत होती.. पण, प्रसादला हे सर्व बालिशपणाचं लक्षण वाटत होतं.. त्याचं भूत-प्रेतांवर जराही विश्र्वास नव्हता.. त्यामुळे मांत्रिकाला बोलावण्यासाठी त्याचा साफ विरोध होता आणि त्याने तसं घरच्यांना खडसावून सांगितलंदेखील.. घरातली मंडळी हे कधीच प्रसादच्या बोलण्याबाहेर जात नसत.. त्यांना त्याचा स्वभाव चांगलाच माहिती होता.. डाॅक्टर अजून कसे आले नाहीत ह्या विचाराने तो बैचेन होत होता..
"अरेऽऽ..परत एकदा त्या डाॅक्टरला फोन करून बघ ना, कुठपर्यंत पोहोचलेत ते तरी समजेल.." त्याचे वडील आता नं रहावून बोलले.. प्रसादने डाॅक्टरांना फोन करण्यासाठी मोबाईल खिशातून काढला.. अन फोन लावणारंच होता की तेवढ्यात मागून कोणीतरी ओरडलं, "ते बघा, डाॅक्टरसाहेब आले.." प्रसाद पटकन पुढे होवून डाॅक्टरांच्या हातातील बॅग घेत बोलतो, " काय डाॅक्टर, किती ऊशीर..माझा मित्र बघा अजून शुद्धीवर आला नाहीए.." डाॅक्टर त्याला शांत करत समीरच्या दिशेने येतात.. समीरच्या खाटेशेजारच्या स्टूलवर बसून ते त्याला तपासायला लागतात.."हम्म..हार्ट रेट खुप वाढला आहे आणि शरीरसुद्धा थंडं पडलं आहे.. कदाचित खुप घाबरल्यामुळे त्याला चक्कर आली असावी.. मी गोळ्या देतो लिहून ते वेळेवर द्या.. येईल शुद्धीवर .. एक इंजेक्शन देतो मी आता ह्याला.. त्याने जरा बरं वाटेल.." डाॅक्टर इंजेक्शनची तय्यारी करतंच बोलतो..
"डाॅक्टर, घाबरण्यासारखं काही कारण नाहीए ना..??" प्रसाद थोड्या दबक्या आवाजात डाॅक्टरांना विचारतो..
"नाही नाही.. घाबरण्याचं काही कारण नाहीए.. मी इंजेक्शन दिलंय.. तेव्हा आराम करू द्या ह्यांना.. होतील बरे.." डाॅक्टर प्रसादला धीर देत बोलतो.. हातात औषधांची चिठ्ठी देवून डाॅक्टर निघून जातात.. प्रसाद ती चिठ्ठी बंड्या काकांना देवून औषधे आणायला पाठवतात.. सर्वजण समीरच्या खाटेशेजारी जमा होतात.. सर्वांच्याच चेह-यावर एक भिती स्पष्ट जाणवत होती..
" ऐवढा लांबून आपल्या इथे लग्नकार्यासाठी आला बिच्चारा आणि हे काय होवून बसलं बघा.." प्रसादची आई कपाळावर हात ठेवून पुटपुटते..
"काय रे प्रसाद , तुझा मित्र तर येणार नव्हता ना लग्नाला.. मग हा असा अचानक कोणालाही नं कळवता कसा काय आला??" प्रसादचे वडील आश्चर्याचा सूर आणत विचारतात.. प्रसादच्या डोक्यातही खरं तर हाच विचार कधीपासून घोळत होता.. कारणही तसंच होतं.. जेव्हा समीरला लग्नाचं निमंत्रण दिलं होतं तेव्हा त्याने येण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता.. ऑफिसमधून सुट्टी भेटणार नाही असलंच काहीतरी कारण त्याने सांगितलं होतं.. मग असं असताना हा असं नं सांगता अचानक कसा काय आला..?? समीर तर कधी अश्या प्रकारचा हलगर्जीपणा कधीच करत नाही.. मग ह्यावेळेस त्याने काही नं कळवता कसा काय आला..?? "अरे बोल की प्रसाद.." प्रसादचे वडील खेकसावून बोलतात.. प्रसाद त्यांच्या खेकसवण्याने विचारांच्या गुंतागुंतीमधून दचकून बाहेर येतो..
"मलाही काही कळत नाहीए बाबा.. लग्नाला येणार नाहीए हे त्याने मला आधीच कळवलं होतं.. मग असा अचानक.." प्रसाद बोलता-बोलता पुन्हा विचारात जातो..
"माझं येका पोरांनो, त्या मांत्रिकास्नी निरोप धाडा.. त्योच सांगल संमदं.. ह्यो गुंता डाक्टराच्या अवसंधानं सुटायचा न्हाय.."
आजी पुन्हा जीव ओतून बोलली.. समिरसुद्धा अजून शुद्धीवर आला नव्हता.. डाॅक्टरांच्या औषधांचा म्हणावा तसा परिणाम त्याच्यावर झाला नव्हता.. आणि त्यातंच लग्नसुद्धा दोन दिवसांवर येवून ठेपलं होतं.. म्हणून मग शेवटी नाईलाजाने प्रसाद आजीचं बोलणं ऐकून मांत्रिकाला आणण्यासाठी राजी होतो.. बंड्याकाका तडक उठून कोणी सांगाण्याच्या आधीच मांत्रिकाला बोलवायला निघून जातात..!!

काही वेळाने बंड्याकाका मांत्रिकाला घेवून येतात.. त्या मांत्रिकाला पहिल्या नजरेत बघितल्यावर तो खरंच मांत्रिक आहे का असा प्रश्न प्रसादच्या डोक्यात आला.. कारण, ह्या मांत्रिकाचा वेश तसा नव्हता जसा मूव्हीजमध्ये दाखवतात.. गळ्यात कवट्यांची माळ, अंगावर काळी कपडे, लांब-लांब केसं आणि कपाळावर अंगारा मळलेला काळाकुट्टं चेहरा.. ह्यापैकी काहीच नव्हतं.. ह्याचा वेश तर एखाद्या साध्या माणसासारखाच होता.. त्याने अंगावर सफेद रंगाचा फुल हाताचा शर्ट आणि काळी पँट घातली होती.. अंगाने तो थोडा भरभक्कमंच होता.. डोळ्यांत एक वेगळाच तेज होता त्याच्या.. " या या बुवा.. आता तुम्हीच हा गुंता सोडवू शकता.." प्रसादचे वडील अगतिक होवून मांत्रिकाला बोलले.. मांत्रिक काहीच नं बोलता सरळ समीरजवळ आला.. त्याने सोबत आणलेला अंगारा हाताच्या मुठीत घट्ट पकडून कसला तरी मंत्र पुटपुटतो.. मग झपकन डोळे उघडून ती अंगा-याने भरलेली मुठ समीरच्या कपाळावर मळतो.. आता पुढे काय होणार ह्या आशेने सर्वजण श्वास रोखून पहायला लागतात.. अंगारा कपाळावर मळल्याबरोबर समीरच्या शरीराला एक जोरदार झटका बसतो.. आणि त्या आकस्मित झटक्याबरोबरंच त्याचे डोळे झपकन उघडतात.. समीरचे डोळे आता पुर्ण पांढरे झालेले होते.. हा नजारा बघून घरातली मंडळी हादरून जातात.. प्रसादसुद्धा डोळे फाडून ते सारं पहात होता.. मांत्रिक आता समीरच्या डोळ्यांत पहायला लागतो.. त्याची नजर समीरच्या डोळ्यांत काहीतरी शोधत असते.. आणि थोड्याच वेळात त्या मांत्रिकाला ते दिसतं ज्यामुळे हे सर्व घडलं असतं..

क्रमशः

लेखक- सतीश रमेश कांबळे.

अनोळखी.. एक भयकथा ( 1st Part ) Link :-  https://goo.gl/irc5Df

अनोळखी.. एक भयकथा ( 2nd Part ) Link :- https://goo.gl/CYZLtu

अनोळखी.. एक भयकथा ( 3rd Part ) Link :- https://goo.gl/4B8Ff8

अनोळखी.. एक भयकथा ( 4th Part ) Link :- https://goo.gl/G3k7vA

अनोळखी.. एक भयकथा ( 5th Part ) Link :- https://goo.gl/kMn2Re

अनोळखी.. एक भयकथा ( 6th Part ) Link :- https://goo.gl/iHN4jC

अनोळखी.. एक भयकथा ( 7th Part ) Link :- https://goo.gl/kyCTfh



DMCA.com Protection Status

No comments:

Post a Comment